Breaking News
केंद्र सरकारचा निर्णय
मुंबई ः केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे. केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाची गुरुवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.
अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे 250-300 कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं. भारतातील सर्व 450 विद्यापीठांमध्ये मराठी शिकण्याची व्यवस्था केली जाणार. प्राचीन ग्रंथांचा अनुवाद केला जाणार.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai