Breaking News
मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
पंढरपूर ः पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी, सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी, बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरिता आशीर्वाद द्यावा, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घातले.
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले, कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अमृता फडणवीस, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजीत पाटील, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारीची परंपरा सातत्याने वाढत आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरीता या ठिकाणी आले. ज्या दिंड्या आहेत त्या सोबत तर वारकरी आलेच परंतु पायी चालत ही मोठ्या प्रमाणात वारकरी आले. विशेषत: या वारकऱ्यांमध्ये तरुणांची संख्या मोठी आहे. शासन व प्रशासनाने वारकऱ्यांना चांगल्या सुविधा दिल्या आहेत. पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर तयार केल्याने वारकऱ्यांसाठी चांगली व्यवस्था झाली, असे त्यांनी सांगितले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाची पूजा करायला मिळणे हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. दिंड्या सोबत अनेक वारकरी स्वयंप्रेरणेने पायी चालत आले. वारीत प्रत्येक व्यक्ती इतरांमध्ये पांडुरंग पाहतो, ही प्रथा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. वारीत हरीनाम गजर करतांना नवी ऊर्जा मिळते. वारीने खऱ्या अर्थाने भागवत धर्माची पताका उंचावत ठेवली आहे. ही आपली संस्कृती अलौकिक आहे असे सांगून मानाच्या वारकऱ्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळत राहो, अशी सदिच्छा श्री. फडणवीस यांनी व्यक्त केली.
निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगला आवश्यक व्यवस्था उपलब्ध केल्याने कुठेही अस्वच्छता पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारी सोबत हरित, पर्यावरण पूरक वारीदेखील झाली. खऱ्या अर्थाने आपल्या संतांनी जो स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे तो या वारीमध्ये प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. राज्याच्या गतीमध्ये अध्यात्मिक प्रगती महत्त्वाची असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे सर्वसामान्य भाविकांचा श्री विठ्ठल दर्शनाचा कालावधी पाच तासाने कमी झाल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. प्रारंभी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी प्रस्तावित केले. यामध्ये यावर्षीच्या आषाढी वारीमध्ये शासन व जिल्हा प्रशासनाने वारकऱ्यांसाठी खूप चांगल्या सुविधा दिल्यामुळे वारकरी वर्ग समाधानी असून वारकऱ्यांची संख्या वाढली आहे व त्यावर योग्य नियंत्रण ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. शासकीय महापूजेचे मानाचे वारकरी मु.पो. जातेगांव ता. नांदगांव जि. नाशिक येथील कैलास उगले आणि कल्पना उगले या वारकरी दाम्पत्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडवणीस यांच्या हस्ते महापुजेनंतर यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळाकडून त्यांना मोफत वर्षभर एसटी पास मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते वितरित करण्यात आला.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai