Breaking News
मुंबई : देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्रात पावसासाठी पोषक वातावरणाची निर्मिती होत असतानाच तिथं बंगालच्या उपसागरात चक्रिवादळसदृश वाऱ्यांची निर्मिती होतानाही दिसत आहे. दरम्यान, उत्तरेकडून हिमालय क्षेत्राच्या दिशेनं येणाऱ्या शीतलहरींचा वेग वाढल्यामुळं कोरड्या वाऱ्यांचाच बहुतांशी परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. राज्यात पुढील 24 तासांमध्ये थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज वर्तवत याच धतवर थंडीचा यलो अलर्ट महाराष्ट्रात जारी करण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रात प्रामुख्यानं हा यलो अलर्ट लागू राहणार असून, उर्वरित राज्यातही त्याचे परिणाम दिसून येतील. फक्त महारष्ट्राचं उत्तर आणि मध्य क्षेत्रच थंडीनं व्यापलं आहे असं नसून, अनेक जिल्ह्यांमधील कमाल आणि किमान तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर असणाऱ्या भागांवर धुक्याची चादर असून, सूर्य डोक्यावर आलेला असतानाही हवेतील गारठा मात्र कायम राहणार आहे.
मागील काही दिवसांपासून मुंबईतही सातत्यानं तापमानातील घट लक्षात घेता इथंही थंडीनं पाय घट्ट रोवल्याचं पाहायला मिळत आहे. मागील 48 तासांमध्ये शहरातील किमान तापमान 17 अंशांवर आल्याचं पाहायला मिळालं असून, राज्यात निफाडमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. जिथं पारा 8.3 अंशांवर पोहोचला होता. देशातील उत्तरेकडे थंडीचा जबर मारा होत असून, पंजाबमध्ये सध्या पारा 6 अंशांपर्यंत खाली आला आहे.
दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेशसह हिमाचल प्रदेश आणि पूर्वोत्तर राज्यांमध्येही थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. जम्मू काश्मीरमध्ये थंडीचा प्रकोप सुरू असून, इथं खोऱ्यामध्ये हिमवृष्टीला सुरुवात झाली आहे. एकंदरच देशाच्या उत्तरेला असणाऱ्या राज्यांमधील गारठा थेट महाराष्ट्रावर परिणाम करत असून, ही थंडीची लाट इतक्यात पाठ सोडणार नाही हेच स्पष्ट होत आहे. पहाटेच्या वेळी थंडीचा प्रभाव अधिक राहणार असल्यामुळं या काळात घराबाहेर पडणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी असाही इशारा देण्यात आला आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai