Breaking News
महत्वाच्या खात्यांसाठी तीनही पक्ष आग्रही ; गृहमंत्री आणि नगरविकास खात्यांसाठी शपथविधी लांबला
मुंबई ः महाराष्ट्र विधानसभेचा निकाल जाहीर होवून आठवडा उलटला तरी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अजित पवार व शिंदे यांनी भाजपचा मुख्यमंत्री बनण्यास समंती दिली आहे. परंतु, शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपद सांभाळल्याने यापुढे त्याखाली काम करणार नसल्याचे शाह यांना सांगितल्याने पुन्हा पेच निर्माण झाला आहे. परंतु अजित दादांसह एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी चर्चा रंगली असली तरी भाजप धक्कातंत्राव्दारे नविन नाव मुख्यमंत्रीपदासाठी सुचविण्याच्या चर्चेने जोर धरला आहे.
राज्यात महायुतीने न भुतो न भविष्यती असा अनपेक्षित विजय मिळवला आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीची धुरा सांभाळली होती. त्यांनी आणलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना राज्यात कमालीची यशस्वी ठरली असून शिंदे यांच्या झोळीत भरभरुन मतांचे दान लाडक्या बहिनींनी टाकले आहे. परंतु, यावेळी भाजपलाही या योजनेचा प्रचंड लाभ झाल्याने त्यांना 131 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. 23 नोव्हेंबरला राज्याचा कौल हाती आला असून आतापर्यंत राज्यात सरकार स्थापन होणे अपेक्षित होते. परंतु, अजूनही राज्याचा मुख्यमंत्री जाहीर न झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी भाजपला मुख्यमंत्री पदासाठी समर्थन जाहीर करुन शिंदे यांच्यावर राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनीही बुधवारी पत्रकार परिषद घेऊन भाजप जो काही निर्णय घेईल त्याला समर्थन देण्याची घोषणा केली. त्यामुळे आता भाजपचा मुख्यमंत्री होईल असे असताना अजुनही भाजपकडून कोणतीच घोषणा न झाल्याने सारेच काही आलबेल नसल्याचे बोलले जात आहे. शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री होणार नसल्यास आपण मंत्रिमंडळात सामील होणार नसल्याचे दिल्ली भेटीत अमित शाह यांना कळवल्याने भाजपची चिंता वाढली आहे. भाजपही ताक फूंकून पीत असून अजूनपर्यंत त्यांनी फडणवीस यांना हिरवा कंदिल दाखवला नाही. निवडणूकीत मराठा चेहरा मुख्यमंत्री असल्याने त्याचा फायदा झाल्याने राज्याचा मुख्यमंत्री मराठा करावा अशी मागणी भाजप नेत्यांकडूनही होत आहे. फडणवीस यांच्याबद्दल प्रचंड नाराजी राज्यात असल्याने नेहमीप्रमाणे भाजप धक्कातंत्राव्दारे राज्यात नवा चेहरा देण्याची चर्चा राजकीय वर्तूळात होऊ लागली आहे. भाजपने बिहारच्या धतवर अजित पवारांसोबत एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचे सुत्रांकडून कळत आहे. याला मुख्यमंत्री शिंदे कसा प्रतिसाद देतात याकडे भाजपचे लक्ष लागले आहे. दरम्यान शिंदे यांनी आपला मुक्काम गावी हलविल्याने राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai