Breaking News
उद्या होणार मंत्रिमंडळ विस्तार; भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार
मुंबई ः महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला असून उद्या, 15 डिसेंबरला शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे. मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाले असून नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेतील. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमाला वेग आला असून मुंबईऐवजी आता नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असल्याचे निश्चित झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडून आणत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्याने महायुतीत सर्वाधिक मंत्रीपदं भाजपच्या वाट्याला येणार आहेत. एकनाथ शिंदेंच्या नाराजीमुळे मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे जाईल अशी चर्चा होती. मात्र, आता लवकरच खातेवाटप होणार आहे. महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार आणि नव्या मंत्र्यांचा शपथविधी नागपुरात रविवारी दुपारी 3.00 वाजता होणार असल्याचे समजते.
राज्यातील फडणवीस सरकारचं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवनऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दरबारी जाऊन वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर त्यांची चर्चा झाली. तर, अजित पवार हेही दोन दिवस दिल्ली दौऱ्यावर होते, त्यांनीही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्याचं पाहायला मिळालं. दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यामुळे,मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पूर्ण होऊन आता नावांची यादी लवकरच समोर येईल. शिदेंना गृह खाते देण्यास भाजपने स्पष्ट नकार दिल्याने हे खाते भाजपकडेच राहणार आहे. पीडब्ल्यूडी आणि नगरविकास खाते शिंदेच्या वाटेला येणार असून राष्ट्रवादीला अर्थखाते मिळू शकते. मात्र नक्की कोणाले कोणते खाते जाते हे शपथविधी झाल्यावरच स्पष्ट होणारआहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai