Breaking News
सिडबी कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद
मुंबई : काळाची गरज ओळखून स्टार्टअप्स धोरणाचा नवीन मसुदा तयार केला आहे. उद्योजकांना सूचनांसाठी हा मसुदा उपलब्ध करून देण्यात आला असून हे देशातील आधुनिक धोरण ठरणार आहे. या माध्यमातून राज्यात नाविन्यता शहराची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच सिडबी (स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया) कडून स्टार्टअप्ससाठी दोनशे कोटी रुपयांची तर प्रत्येक प्रादेशिक विभागासाठी तीस कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
बांद्रा-कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्यावतीने एम्पॉवरींग इनोव्हेशन, एलिव्हेटिंग महाराष्ट्र या संकल्पनेवर आधारित ‘राष्ट्रीय स्टार्टअप्स दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दीप प्रज्वलन झाले.
कार्यक्रमात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त प्रदीपकुमार डांगे, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, मेरीको लिमिटेडचे अध्यक्ष हर्ष मारीवाला, अपग्रेड अँड स्वदेस फाऊंडेशनचे सहसंस्थापक रॉनी स्क्रूवाला, नायकाच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फाल्गुनी नायर यासह, स्ट्राइड व्हेंचर्स आणि स्ट्राइडवनचे संस्थापक इशप्रीत सिंग गांधी, आयआयटीचे माजी विद्याथ कल्याण चक्रवत, गो इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालक इप्सिता दासगुप्ता, महाराष्ट्रासह देशभरातील तंत्रज्ञान, कृषी, सेवा क्षेत्र, औषधनिर्माण तसेच पर्यटन अशा विविध क्षेत्रांतील एक हजार स्टार्टअप्स या कार्यक्रमात उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, नवं उद्योजक आणि महिला उद्योजकांच्या नवकल्पना सक्षम करून महाराष्ट्राची उन्नती करण्यात येणार आहे. देशात स्टार्टअप्स सुरू झाले तेव्हा 471 स्टार्टअप्स होते, आज देशात एक लाख 57 हजार स्टार्टअप्स झाले आहेत. राष्ट्रीय स्टार्टअप्स दिनानिमित्त अभिमानाने सांगावेसे वाटते की, महाराष्ट्र केवळ भारताच्या स्टार्टअप्स क्रांतीत सहभागी नाही तर त्याचे नेतृत्व करत आहे. राज्यात 26 हजार स्टार्टअप्स आहेत. देशात सर्वात जास्त महिला संचालक असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्र पहिल्या सात राज्यात आहे.
उद्योजक, दूरदश गुंतवणूकदार, धोरणकर्ते, इन्क्युबेटर्स, विद्यापीठे हे उद्योग क्षेत्रातील बदलाचे प्रणेते आहेत. ‘इज ऑफ डूईंग’ बिझनेसमुळे उद्योग कमी वेळात सुरू करण्यामध्ये पारदर्शकता आली आहे. गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात पहिला आहे. भविष्यातही मानवी हस्तक्षेप न ठेवता पारदर्शक पद्धतीने उद्योजकांना राज्यात शासना बरोबर उद्योग सुरू करण्याची संधी प्राप्त करून दिली जाणार आहे. भांडवली सहभागाच्या दृष्टीने मुंबई आघाडीवर असून, पुणे तंत्रज्ञान आणि नवकल्पनांचे केंद्र आहे. आपली टियर-2 आणि टियर-3 शहरे महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावत आहेत. नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर ही शहरे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देत आहेत आणि इकोसिस्टम निर्माण करतात, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स महाराष्ट्राच्या नवकल्पना स्टार्टअप्सला बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. ग्रामीण भागातील नवकल्पना असलेल्या तरुणांचा उद्योगात सहभाग वाढवणार असून, उद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग, कायदेशीर सहाय्य इत्यादी सेवा देणाऱ्या इन्क्युबेटर्सना स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. शासकीय आणि खासगी विद्यापीठे या भविष्यातील स्टार्टअप्सना बळकटीकरण देणाऱ्या संस्था आहेत. विद्यापीठे आणि इन्क्युबेटर्स हे रोजगार निर्माण करणारे घटक असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
‘ए आय’ स्टार्टअप्सचे सक्षमीकरण करून उत्कृष्टतेचे केंद्र बनतील. एआय हे तंत्रज्ञानातील भविष्य असून स्टार्टअप्ससाठी मोठे योगदान देणारे ठरणार आहे. यामुळे केवळ उद्योगाच्या संधी नाही तर रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. राज्याला स्टार्टअप्समध्ये आघाडीवर आणण्यासाठी राज्य शासनासोबत काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी उपस्थित उद्योजकांना केले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai