Breaking News
तळाः तालुक्यातील गिरणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील नानवली गावाला स्वदेस फाऊंडेशनकडून स्वप्नातील गाव हे मानांकन घोषित झाले आहे. ग्रामीण भारताला सक्षम बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून काम करणाऱ्या स्वदेश फाऊंडेशनच्या ड्रीम व्हिलेज अर्थात स्वप्नातील गाव याउपक्रमाअंतर्गत असलेली स्वच्छ, सुंदर स्वास्थ, साक्षर, सक्षम, स्वावलंबन या पाच बाबींवर काम केल्याने नानवली गावाला हा बहुमान मिळाला आहे. यासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करणाऱ्या स्वदेस फाऊंडेशनचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात नानवली गावात नुकताच संपन्न झाला.
ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी स्वदेश फाऊंडेशनमार्फत तेथे स्वप्नातील गाव या संकल्पनेअंतर्गत विकास कामे केली जातात. पाणी, वीज, शिक्षण, आरोग्य, रोजगार, आर्थिक विकास असे एक-दोन नाही तर तब्बल 41 प्रकारचे पॅरामीटर समाविष्ट करुन त्यावर सातत्यपुर्ण काम करुन ते गाव ड्रीम व्हिलेज म्हणून घोषित केले जाते. नानवली गावाचा स्वप्नातील गाव करण्याच्या उद्देशाने प्रवास सन 2019 मध्ये सुरु झाला. ड्रीम व्हिलेज उपक्रमाचा सुरळीत प्रवाह ग्राम विकास समितीद्वारे समुदाय नेतृत्व निर्माण करून आणि त्यांचे पालनपोषण करून साध्य केला जातो. गाव विकास समितीच्यावतीने, सदस्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्याने विविध विकासकामे, मानांकने व मापदंड पुर्ण केल्याने आज नानवली हे स्वप्नातील गाव म्हणून घोषित झाले आहे. या स्वप्नपुतचा आनंद साजरा साजरा करण्यासाठी तसेच यामागे ज्यांचे अथक मेहनत, परिश्रम आहेत अशा स्वदेस फाऊंडेशनच्या प्रतिनिधींचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी गावाच्या प्रवेश कमानीचे उद्घाटन तळा उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांच्या हस्ते फित कापुन करण्यात आले. कार्यक्रमाला स्वदेशचे प्रतिनिधी, सरपंच लिला जाधव, उपसरपंच नागेश लोखंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नानासाहेब भौड, रा. काँ. महिला अध्यक्ष जान्हवी शिंदे , ग्रामपंचायत सदस्य, नानवली पुरुष व महिला मंडळ, पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होत्या. नानवली महिला मंडळाने यावेळी लेझिमच्या तालावर ठेका धरत पाहुण्यांचे स्वागत केले. मान्यवरांना श्री दत्तगुरुंची प्रतिमा, शाल आणि तुळसीचे रोप भेट देवून सत्कार करण्यात आला. पाहुण्यांनी मार्गदर्शनपर भाषणात स्वप्नातील गावातील नागरिकांचे कौतुक व अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुमधुर असे स्वागतगीत सादर करुन विद्याथनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. मोना विलास सणस यांनी प्रभावी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर माध्यमिक शिक्षक मनोज भाऊ सुतार यांनी बहारदार असे सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सगळ्या सोहळ्यामध्ये ग्रामस्थांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
मोना माळी-सणस