Breaking News
पनवेल ः नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्याने महिला प्राचार्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पनवेल तालुक्यातील पोयंजे गावातील एका खासगी नर्सिंग कॉलेजमध्ये घडली. याप्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात एका नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, मृत विद्यार्थ्याचे नाव उदय मोतीलाल आगळे (वय 19) असे असून तो बी.एस्सी. नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता.
विद्यार्थ्याने 3 जून रोजी वसतिगृहातील खोलीत ग्रीलला कमरेचा पट्टा बांधून आत्महत्या केली. पोलीस तपासात उघड झाले आहे की, डिसेंबर 2024 पासून जून 2025 पर्यंत पीडित विद्यार्थ्याला प्राचार्येकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. फिर्यादी असलेल्या विद्यार्थ्याच्या आईने पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, प्राचार्य महिलेने अनेकदा विद्यार्थ्याला जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले. इतर विद्यार्थ्यांसमोर त्याचा अपमान करण्यात आला होता.
या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि कलम 352(1) (जानबुजून अपमान करून शांततेचा भंग घडवून आणण्याचा हेतू) नुसार गुन्हा नोंदवला आहे. त्यासोबतच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत संबंधित कलमांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. तपास सुरू असून महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले जात आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे आणि सर्व पुरावे गोळा केले जात आहेत.‘या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये आणि दलित समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विविध सामाजिक कार्यकर्ते आणि विद्याथ संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलने करण्यास सुरुवात केली असून, संबंधित प्राचार्येवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. तपास अधिकारी म्हणाले, प्रकरण गंभीर असून संपूर्ण तपास अत्यंत बारकाईने केला जात आहे. विद्याथ आणि त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी कायदेशीर पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai