Breaking News
महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी
मुंबई ः महाराष्ट्रात भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर दिड टक्याने वाढ झाली आहे. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत 14 हजार कोटींचा महसूल वाढणार आहे. राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने हा निर्णय घेतला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने मद्याचे दर वाढवले आहेत. या विभागाचा महसूल वाढविण्याच्या दृष्टीने सचिवस्तरीय अभ्यासगट स्थापन करण्यात आला होता. या गटाने मद्यनिर्मिती धोरण, अनुज्ञप्ती, उत्पादन शुल्क तसेच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यातील राबविण्यात येत असलेल्या चांगल्या पद्धतींचा, धोरणात्मक बाबींचा अभ्यास करुन शासनास शिफारशी व अहवाल सादर केला. त्या अनुषंगाने उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृतीबंधास तसेच विभागाचे एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे. या कक्षाच्या माध्यमातून एआय प्रणालीद्वारे राज्यातील आसवन्या, मद्य निर्माणी, घाऊक विक्रेते आदींचे नियंत्रण करण्यात येणार आहे. भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याच्या रू. 260 प्रति बल्क लिटर पर्यंत निर्मिती मूल्य घोषित केलेल्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर निर्मिती मूल्याच्या 3 पट वरुन 4.5 पट करण्यात येणार. देशी मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर प्रति प्रुफ लिटर रुपये 180 वरुन रुपये 205 करण्यात येणार. मद्य शुल्कवाढीसह सोबतच सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. महाराष्ट्र मेड लिकर हा धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये फक्त महाराष्ट्रातील मद्य उत्पादक असे उत्पादन करु शकतील. त्यांना या नव्या प्रकारातील उत्पादनाची (ब्रँड) नवीन नोंदणी करुन घेणे आवश्यक राहील.
वाढीव अधीक्षक कार्यालय
या विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार मुंबई शहर व उपनगरात एक नवीन विभागीय कार्यालय व मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर व अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांकरिता प्रत्येकी एक वाढीव अधीक्षक कार्यालय नव्याने सुरू करण्यात येणार आहे.
प्रकारानुसार किंमत
उत्पादन शुल्काच्या दरातील वाढ व अनुषंगिक एमआरपी सूत्रातील बदल यामुळे 180 मि.ली. बाटलीची किरकोळ विक्रीची किमान किंमत मद्य प्रकारनिहाय पुढीलप्रमाणे : देशी मद्य 80 रूपये, महाराष्ट्र मेड लिकर 148 रूपये, भारतीय बनावटीचे विदेशी मद्य- 205 रूपये, विदेशी मद्याचे प्रिमियम ब्रँड 360 रूपये.
1 हजार 223 पदांना मंजुरी
मंत्रिमंडळ बैठकीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बळकटीकरणासाठी 744 नवीन पदे व पर्यवेक्षीय स्वरूपाची 479 पदे अशा 1 हजार 223 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आली आहे. विभागासाठी या विविध उपाययोजना राबविल्यानंतर मद्यावरील उत्पादन शुल्क व विक्री कराच्या माध्यमातून दरवष सुमारे 14 हजार कोटींची महसूल वाढ अपेक्षित आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai