Breaking News
मुंबई : पणन विभागाशी संबंधित माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
विधान परिषदेमध्ये आमदार शशिकांत शिंदे यांनी औचित्याच्या मुद्याच्या माध्यमातून उपस्थित केलेल्या पणन विभागाशी संबंधित माथाडी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर, आमदार शशिकांत शिंदे, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
वाराई (वारणार) कामगार नोंदीत नसताना अनधिकृतपणे काम करीत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. या बैठकीत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या विविध मुद्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी वाराई विषयाबाबत कामगार विभागाशी समन्वय साधून धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कायदा लागू करण्याची मागणी आमदार शशिकांत शिंदे व नरेंद्र पाटील यांनी केली. त्याबाबत कायद्यातील तरतुदी तपासून संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती प्रतिनिधी यांच्याशी बैठक घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल, असे पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले.
त्याचबरोबर बाजार समितीच्या अनुज्ञप्तीधारक मापारी/ तोलणार कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे, नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी/ मापारीच्या प्रश्नांची आणि नाशिक रेल्वे धक्क्यावरील प्रश्नांची सोडवणूक करणे आदींबाबतही चर्चा करण्यात आली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai