Breaking News
उरण ः शिवसेना पक्षात सर्वात मोठे पद हे शिवसैनिक आहे. ग्रामीण भागात सर्वच नागरिकांसोबत संवाद साधण्याचा महत्त्वाचा दुवा शाखाप्रमुख आहे. शिवसेनेचे विचार व कार्य तळागाळात पोहोचवायचे असेल तर शाखाप्रमुखांनी मतदारांशी, नागरिकांशी मोठ्या प्रमाणात संवाद साधून शिवसेना घराघरात पोहोचवली पाहिजे. त्यासाठी शाखाप्रमुख पद व त्याचे कार्य महत्त्वाचे आहे. मात्र कालांतराने शाखाप्रमुख हा काम करीत नसल्याने कमकुवत झाला. त्या त्या भागातील नागरिकांशी मतदारांशी त्यांच्या संवाद तुटला आहे. मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरलो तिथे मात्र शाखाप्रमुख पाहिजे त्या पद्धतीने काम करताना दिसत नाहीत त्यामुळे पक्षाचे खूप मोठे नुकसान होत आहे. आता मात्र शाखाप्रमुखांना चार्ज करायची वेळ आली आहे असे परखड व आक्रमक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी उरण येथे मांडले.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उरण विधानसभा मतदार संघातील निष्ठावंत शिवसैनिकांची संघटनात्मक मोट बांधण्यासाठी व पुढील आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार, 29 जून 2025 रोजी उरण तालुक्यातील मल्टीपर्पज हॉल टाऊनशिप येथे करण्यात आले होते. यावेळी भास्कर जाधव बोलत होते. भास्कर जाधव यांनी यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. भास्कर जाधव यांनी यावेळी मार्गदर्शन करताना महायुतीच्या विविध योजना, निर्णयावर कडाडुन टीका केली. भाजपाने राज्यात सुरू असलेल्या परिवहन सेवेच्या महामंडळाचे सरकारीकरण करण्याचे वचन दिले होते ते वचन पूर्ण केले नाही शिवाय कर्मचाऱ्यांचे दोन महिन्याचे पगार थकविले आहे. कृषी कर्जमाफीचा आश्वासन दिले होते ते अजूनही पूर्ण झाले नाही. महिलांना महिन्याला 2100 रुपये देणार असे सांगितले तिथेही लाडक्या बहिणीची फसवणूक केली. शासन आर्थिक तोट्यात असताना केवळ विविध जाती धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी त्यांना आकर्षित करण्यासाठी ही प्रत्येक समाजासाठी नवीन महामंडळ स्थापन करण्यात आली. मराठा ओबीसी समाजात भांडण लावून समाजात फूट पाडले. जाती धर्मात भांडणे लावले त्यामुळे अशा जनतेची फसवणूक करणारा पक्षापासून सावध रहा असा सल्ला मार्गदर्शन प्रसंगी नेते भास्कर जाधव यांनी दिला. तसेच मी शिंदे गटाप्रमाणे सुरतला गेलो किंवा गुवाहाटीला गेलो तर राजकारणातुन निवृत्ती होईन. माझ्या विरोधात वेगवेगळे कट कारस्थान रचले जात आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. खोट्या पुरावाच्या आधारे जेलमध्ये टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र मी शिवसैनिक असल्याने खंबीर आहे. आयुष्यात कोणतेही चुकीचे काम केले नसल्याने मी अशा गोष्टींना घाबरत नाही. सर्वांना विनंती करतो की मराठी माणसांने वेळीच सावध व्हा अन्यथा आपले अस्तित्व संपण्यास वेळ लागणार नाही असे आवाहनही भास्कर जाधव यांनी केले. यावेळी भास्कर जाधव यांनी नवी मुंबई विमानतळ, मराठी भाषा, हिंदी भाषा सक्ती आदी विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या मेळाव्याला उपस्थित असलेले शिवसेना उपनेते विश्वनाथ नेरूरकर यांनी आपल्या ओघवती शैलीमध्ये पदाधिकारी कार्यकर्त्याशी संवाद साधला. जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनीही पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. भाषणे संपताच महाराष्ट्र शासनाने हिंदी विषय सक्ती केल्याने शासनाचा निषेध करत त्या निर्णयाची होळी करण्यात आली. या मार्गदर्शन मेळाव्याला उरण पनवेल खालापूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरला होता. महिला भगिनींचीही उपस्थिती लक्षणीय होती. अतिशय सुंदर व जोशपूर्ण असा हा मार्गदर्शन मेळावा होता. या मेळाव्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता. या मेळाव्याला शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्याचा उत्तम प्रतिसाद लाभला होता. या मेळाव्यामुळे उरण विधानसभा मतदारसंघ अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai