Breaking News
उरण ः उरण तालुक्यात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून त्यात अपघात होऊन मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढतच आहे. पागोटे गावाजवळील पुलावर सोमवारी दुचाकीवरील भीषण अपघातात एक तरुण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. दोघेही नवी मुंबई परिसरातील असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
अपघाताचे नेमके कारण काय? याचे उत्तर अद्याप प्रशासनाकडे नाही. पुलावर रक्ताच्या थारोळ्यात तडफडणाऱ्या मृतदेहांची अवस्था या अपघाताच्या तीव्रतेची साक्ष देत आहे. वेळेवर मदतीचा हात कोणीच पुढे न केल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली आहे. उरणमध्ये अपघातग्रस्तांना वेळेत कधीही प्राथमिक उपचार व सेवा सुविधा मिळत नसल्याने अनेक प्रवाशांचे मृत्यू झाले आहेत. अशा अनेक घटना उरणमध्ये घडल्या आहेत. उरण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा सुरु केला असून, मृतदेह इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. मृत व्यक्ति कोण आहेत याचा अधिक तपास पोलीस प्रशासनातर्फे सुरु आहे.मात्र प्रशासनाचा अपघातापूर्वीचा निष्क्रियपणा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.उरण परिसरात अपघातांची साखळी सुरूच आहे याचा प्रत्यय पागोटे येथील अपघाताच्या घटनेने पुन्हा दिसून आला आहे.पागोटे परिसरातील पुलावर ना गतिरोधक, ना सीसीटीव्ही, ना वेगमर्यादा यंत्रणा - अशा स्थितीत अपघातांचे प्रमाण वाढतच आहे. दर महिन्याला याच रस्त्यावर एक जीव जातोय, पण प्रशासनाकडे फक्त प्रेसनोट काढण्याची तत्परता आहे. अपघातापूर्व उपाययोजना करण्यासाठी वेळ नाही, हे चित्र दुर्दैवी आहे.हे चित्र कधी बदलणार असा सवाल आता उपस्थित होत आहे.स्थानिकांमध्ये या अपघाता नंतर तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे.या घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्ये असंतोष आहे. “रस्ता आहे, वाहनं आहेत, पण सुरक्षा कुठे आहे?“ असा सवाल उपस्थित करण्यात येतोय. मृतांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.कायम स्वरूपी उपाययोजना केल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल. व मृत्यूचे देखील प्रमाण कमी होईल अशी अपेक्षा जनतेने व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai