Breaking News
उरण ः ब्रह्माकुमारीज राजयोग ध्यान केंद्र, उरण येथे एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात 10वी व 12वीच्या बोर्ड परीक्षेत 75% पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. उरण येथील विविध शाळांमधून 30 हून अधिक विद्यार्थी आणि काही पालक या कार्यक्रमात सहभागी झाले. या उपक्रमाचे उद्दिष्ट होते विद्यार्थ्यांना प्रेरणा देणे, आत्मिक बळ प्रदान करणे आणि जीवनात सकारात्मकता व एकाग्रता निर्माण करणे.
कार्यक्रमाचे संचालन बीके प्रियांका बहन यांनी उत्साही व संयमित पद्धतीने केले. ब्रह्माकुमारीज तारा दीदी, जे उरण केंद्राच्या इंचार्ज आहेत, यांनी राजयोग ध्यान अभ्यासक्रमाचे महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी स्पष्ट केले की ध्यानाच्या नियमित सरावाने मनाची एकाग्रता, आत्मविश्वास आणि शांतता यामध्ये वाढ होते. सीए बीके कुमुदिनी बहन यांनी डिजिटल डिटॉक्स विषयावर मार्गदर्शन केले. मोबाईल आणि सोशल मीडियाचा योग्य व मर्यादित वापर विद्यार्थ्यांसाठी किती आवश्यक आहे, हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले. बीके प्रमोदभाई यांनी सांगितले की, जीवनातील मोठमोठ्या अडचणी व आव्हानांनाही राजयोग ध्यानाच्या सरावाने सहजतेने पार करता येते. आत्मिक बळ आणि सकारात्मक दृष्टीकोन यामुळे मानसिक स्थैर्य प्राप्त होते. विशेष अतिथी जेष्ठ पत्रकार दिनेश पवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत, पालकांशी संवाद ठेवण्याचे, त्यांचा आदर करण्याचे आणि त्यांच्या सोबत दररोज काही वेळ घालवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.सर्व विद्यार्थ्यांनी 3 मिनिटांचे राजयोग ध्यान अनुभवले, ज्यामध्ये त्यांनी अंतर्मनातील शांती, समाधान आणि सकारात्मक ऊर्जा अनुभवली. या अनुभूतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये मानसिक स्थिरता आणि आनंद निर्माण झाला.कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना ब्रह्माकुमारीजचा 7 दिवसांचा राजयोग ध्यान अभ्यासक्रम करण्यासाठी मुक्त आमंत्रण देण्यात आले. हा अभ्यासक्रम पूर्णतः विनामूल्य आणि सर्वांसाठी खुला आहे.विद्यार्थ्यांना हेही सांगण्यात आले की, त्यांना करिअर, अभ्यास, मनाची अस्वस्थता किंवा ताण यासंदर्भात सल्ला हवा असल्यास, ते कधीही ब्रह्माकुमारीज उरण केंद्रात मोफत समुपदेशनासाठी येऊ शकतात. हे केंद्र त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी खुले आहे. हा कार्यक्रम केवळ गौरवाचा नव्हता, तर विद्यार्थ्यांसाठी नवीन दिशा, प्रेरणा आणि आत्मिक जागृती देणारा अनुभव ठरला. यशस्वी भवितव्यासाठी आत्मशक्ती, संयम, सद्विचार व मूल्याधारित जीवनशैली यांचे महत्व या उपक्रमातून प्रभावीपणे अधोरेखित झाले.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai