Breaking News
मच्छीमारांचे पैसे थकवणाऱ्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा
उरण : करंजा मच्छीमार बंदरातील कोट्यवधींची मासळी खरेदी करून त्यांचे पैसे न देता फसवणूक करणाऱ्या दलाल, व्यापारी, निर्यातदारांचा जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे फरार असलेल्या या आरोपींना अटक करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईतील ससून डॉक बंदरातील वाढता ताण कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा येथे सुमारे 250 कोटी रुपये खर्चून मच्छीमारांसाठी अद्यावत बंदर उभारण्यात आले आहे. या करंजा बंदरात मुंबईतील अनेक जुन्या परिचित मासळी व्यापारी, निर्यातदारांनी शिरकाव केला आहे. स्थानिक मच्छीमार व्यापारी, दलालांना हाताशी धरून काही नव्या निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी बंदरातून मासळी खरेदी करण्यास सुरुवात केली होती. बंदरातील शेकडो स्थानिक मच्छीमारांनीही परिचित स्थानिक दलालांवर विश्वास ठेवून कोट्यवधी रुपयांचे मासळी विक्रीचे व्यवहार केले होते. सुरुवातीला निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी स्थानिक मच्छीमारांना मालाचे पैसे देऊन मच्छीमारांचा विश्वास संपादन केला. मात्र त्यानंतर खरेदी केलेल्या मासळीचे पैसे देण्यात दलाल, व्यापारी टाळाटाळ करू लागले. त्यानंतर मच्छीमारांचे कोट्यवधींची थकीत रक्कम अदा न करताच निर्यातदार कंपन्या, व्यापाऱ्यांनी पळ काढला होता. रायगड जिल्ह्यासह स्थानिक हजारो मच्छीमारांना करंजा मच्छीमार बंदर सोयीचे आणि फायदेशीर ठरले आहे. त्यामुळे या करंजा मच्छीमार बंदरातून काही महिन्यांतच सुमारे 600 कोटींहून अधिक रुपयांची मासळी निर्यात करण्यात आली आहे.
स्थानिक मच्छीमारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा, रमेश नाखवा, विघ्नेश कोळी आदी अनेक स्थानिक मच्छीमारांनी फसवणूक करणाऱ्या दलाल, व्यापारी, निर्यातदारांविरोधात उरण पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारीनंतर राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनीही मच्छीमारांची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासूनच यातील संशयित फरार झाले आहेत. यापैकी काहींनी जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी केलेला अर्ज फेटाळून लावण्यात आला आहे. दरम्यान मच्छीमारांनी एकजूट होऊन यापुढे तस्कर टोळ्याकडून फसवणूक होणार नाही यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन करंजा मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी केले आहे.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai