Breaking News
मुंबई ः गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचे आश्वासन देऊन राज्य सरकारने त्यांना मुंबईबाहरे फेकले असून कामगारांची फसवणुक केल्याचा आरोप कोन, पनवेल येथील विजेत्या गिरणी कामगार करत आहे. त्यात कोणत्याही सुविध्ाा नसताना भरमसाठ देखभाल शुल्क आकारण्यात आल्याने टीकाही केली होती. केलेल्या पाठपुराव्यानंतर आता 2019 ते 2022 या कालावधीत घराची रक्कम भरलेल्या विजेत्यांचे 2024-25 चे देखभाल शुल्क माफ करण्यात आले. त्यामुळे कोन, पनवेल येथील कामगार व वारसांना दिलासा मिळाला आहे.
मंडळाने आकारलेल्या देखभाल शुल्काची रक्कम ऐकून विजेते कामगार, वारस हवालदिल झाले होते. 6 लाखांच्या आणि 320 चौ. फुटांच्या पनवेलमधील घरासाठी 2025-26 मध्ये ताबा घेतलेल्यांना महिना 4 हजार 640 रुपयांप्रमाणे 55 हजार 680 रुपये वार्षिक देखभाल शुल्क आकारण्यात आले. तर 2024-25 वर्षासाठी 42 हजार 135 रुपये वार्षिक देखभाल शुल्क आकारण्यात आले होते. एकतर मुंबईच्या बाहेर घरे दिली त्यात गृहप्रकल्पात सुविधांची वानवा आहे. अव्वाच्यासव्वा देखभाल शुल्क आकारले जाते. या देखभाल शुल्कावरून विजेत्या कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यावरून मंडळावर टीकाही झाली. त्यानंतर 2019 ते 2022 या कालावधीत घराची रक्कम भरलेल्या विजेत्यांचे 2024-25 चे देखभाल शुल्क माफ करण्यात आले.
तर 2025-26 वर्षांसाठीचे देखभाल शुल्क महिना 3 हजार 500 रुपये करण्यात आले. मात्र हे देखभाल शुल्कही भरमसाठ असल्याने त्यात कपात करण्याची मागणी कोन, पनवेलमधील विजेत्यांनी केली. तसेच 2019-2024 पर्यंत घराची रक्कम भरलेल्या विजेत्यांचे दोन वर्षांचे शुल्क माफ करण्याचीही मागणी विजेत्यांनी केली होती. मात्र ही मागणी म्हाडा मान्य करीत नव्हते. विजेत्यांचा मात्र या मागणीसाठी कायम पाठपुरावा सुरू होता. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नी एक बैठक झाली. या बैठकीस कोन, पनवेलमधील विजेते डॉ. संतोष सावंत आणि गणेश सुपेकरही उपस्थित होते. यावेळी कोन, पनवेलमधील देखभाल शुल्काचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एकनाथ शिंदे यांनी 2019 पासून 2024 पर्यंत घराची रक्कम भरलेल्या विजेत्यांचे दोन वर्षांचे देखभाल शुल्क माफ केल्याची माहिती गणेश सुपेकर यांनी दिली.
2025-26 आणि 2025-26 वर्षासाठीचे देखभाल शुल्क माफ झाले असून यामुळे मोठ्या संख्येने विजेत्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, 2024 नंतर घराचे पैसे भरून ताबा घेतलेल्या विजेत्यांना महिना 3 हजार 500 रुपयांऐवजी महिना एक हजार रुपये देखभाल शुल्क आकारावे, अशी मागणी यावेळी विजेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती डॉ. संतोष सावंत यांनी दिली.
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai