वॉटर टॅक्सीची सफर सुरु
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2022
- 793
मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण
मुंबई : देशातील पहिल्या मुंबई ते बेलापूर वॉटर टॅक्सी सेवेचं लोकार्पण गुरुवारी करण्यात आले. यामुळे आत बहुप्रतिक्षेत असणार्या नवी मुंबई ते मुंबई वॉटर टॅक्सीची सफर करता येणार आहे. यातून बेलापूर येथून दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटे तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे.
महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत बेलापूर येथून सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ आणि बेलापूर जेट्टीच्या उद्घाटन सोहळ्यास मुख्यमंत्री ठाकरे, केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील जलवाहतूकीचा पुढील टप्पा म्हणून नवी मुंबईपासून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी अशा विविध जलमार्गांवर प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी बेलापूर, नवी मुंबई येथे सुमारे 8.37 कोटी खर्च करुन प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य शासनामार्फत 50 : 50 प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मुंबई ते नेरुळ, बेलापूर, जेएनपीटी, एलिफंटा या मार्गे वॉटर टॅक्सी सेवेचे लोकार्पण करण्यात आले. बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेल्या 7 स्पीडबोटी असतील. 56 प्रवासी क्षमता असलेली एक कॅटामरान बोट अशा एकूण 8 बोटींद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु केली आहे. बेलापूर ते दक्षिण मुंबईत भाऊचा धक्का पर्यंत स्पीड बोटीने फक्त 30 मिनिटं लागतील. तर कॅटामरान बोटीला 45 ते 50 मिनिटांचा कालावधी लागणार आहे. स्पीडबोटीचं भाडं प्रति प्रवासी 800 ते 1200 रुपये असणार आहे. तर कॅटामरान बोटीकरीता प्रति प्रवासी 290 रुपये इतकं ठेवण्यात आले आहे. बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबरच एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर सुद्धा प्रवासी सेवा चालविण्यात येणार आहे.
- बेलापूर ते भाऊचा धक्का (स्पीड बोट) एकेरी भाडे 2 प्रकार रुपये 825 आणि रुपये 1210
- बेलापूर ते भाऊचा धक्का (कॅटामरन) एकेरी भाडे रुपये 290
- बेलापूर ते जेएनपिटी (स्पीड बोट) एकेरी भाडे रुपये 825
- बेलापूर ते एलिफंटा (स्पीड बोट) एकेरी भाडे रुपये 825
लोकार्पणाला केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री कपिल पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे बंदर विकास मंत्री अस्लम शेख, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, खासदार डॉ. विनायक सहस्त्रबुद्धे, खासदार कुमार केतकर, खासदार राजन विचारे, आमदार निरंजन डावखरे, आमदार रविंद्र फाटक, आमदार बाळाराम पाटील, आमदार रमेश पाटील, आमदार मंदा म्हात्रे, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, मेरी टाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सर्वांच्या पस्थितीत महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट यांची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या वॉटर टॅक्सी सेवेचे उद्घाटन झाले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai