ठाण्याचे महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौरपद भाजपकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Jan 30, 2026
- 48
कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरमध्येही महायुतीचा हाच फॉर्म्युला
ठाणे ः ठाणे महानगरपालिकेचे महापौरपदाचे चित्र स्पष्ट झाले असून महापौरपद शिवसेनेकडे तर उपमहापौर भाजपकडे असणार आहे. महापौरपदाची मागणी करणाऱ्या भाजपने आपला निर्णय बदलत उपमहापौरपदावर समाधान मानले आहे. शिवसेनेने महापौरपदासाठी शर्मिला पिंपोलकर तर उपमहापौरपदासाठी कृष्णा पाटील यांचे नाव भाजपने जाहीर केले आहे. याच फॉर्म्युल्याने कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत शिवसेनेकडे महापौरपद तर भाजपकडे उपमहापौरपद असे वाटप झाले आहे.
शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रभाग 20 जिंकणाऱ्या शर्मिला पिंपोलकर यांनी महापौरपदासाठी अर्ज दाखल केला. शर्मिला या शिवसेना नेते रोहित पिंपोलकर यांच्या पत्नी आहेत. भाजपकडून कृष्णा पाटील यांनी उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केला. त्यांच्यविरोधात उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने या दोन्ही निवडी बिनविरोध झाल्या आहेत. आता केवळ 3 फेब्रुवारी रोजी औपचारिक निवड होणे बाकी आहे. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने 75 जागा जिंकल्या, तर भाजपने 28 जागा जिंकल्या.
कल्याण-डोंबिवली पालिका महापौरपदी शिवसेनेच्या ॲड. हर्षली चौधरी-थविल, उपमहापौर पदासाठी भाजपचे राहुल दामले यांनी शुक्रवारी कल्याण डोंबिवली पालिकेचे सचिव किशोर शेळके यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जांमुळे कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचा भगवा फडकला असल्याचे स्पष्ट झाले. शिवसेनेचे सभागृहातील संख्याबळ अधिक असल्याने युतीधर्माप्रमाणे महापौरपदी शिवसेनेचा, उपमहापौरपदासाठी भाजपचा उमेदवार देण्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी निश्चित केले. विरोधकांकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने ही निवड बिनविरोध होणार आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांची बैठक झाल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांच्या देखील बैठक पार पडली. ही बैठक मुख्यतः ठाणे कल्याण डोंबिवली उल्हासनगर नवी मुंबई या महानगरपालिकांसाठी होती. याच बैठकीनंतर भाजपचा विरोधी पक्षात बसण्याचा सूर मावळला अशी सूत्रांची माहिती आहे. ठाण्यासह इतर महानगरपालिकांमध्ये महापौर आणि उपमहापौर पद ठरल्यानंतर कोणत्या समित्यांवर कोणत्या पक्षाचे नगरसेवक बसतील यासंदर्भात देखील फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
- उल्हासनगरमध्ये कलानी गटाला संधी
निवडणुकीत एकमेकांविरूद्ध आरोपांची राळ उठवणारे शिंदेंची शिवसेना आणि भाजप अखेर उल्हासनगरात सत्तेसाठी एकत्र आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने कलानी गटातील शिवसेना चिन्हावर निवडणूक जिंकलेल्या अश्विनी निकम यांना महापौरपदासाठी तर भाजपच्या वतीने अमर लूंड यांना उपमहापौर पदासाठी संधी देण्यात आली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai