वर्षभरात गुन्ह्यांची 80 टक्के उकल
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 06, 2026
- 69
नवी मुंबई पोलिसांचा गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश
नवी मुंबई : चोवीसतास ऑनड्युटी असणाऱ्या नवी मुंबई पोलीस प्रशासनाने 2025 मध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी करुन वर्षभरात घडलेल्या विविध प्रकारच्या गुन्हांची 80 टक्के उकल केली आहे. सन 2024 पेक्षा सन 2025 मध्ये गुन्हे घडण्याचे प्रमाण जास्त होते. मात्र नवी मुंबई पोलीसांनी गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश ठेवून गतवर्षीपेक्षा 2025 मध्ये गुन्हे उकल करण्याच्या प्रमाणात सुधारणा केली आहे. महिलांची सुरक्षा, नशामुक्त शहर आणि सायबर गुन्हेगारी रोखणे या त्रिसूत्रीवर पोलिसांनी दिलेला भर यशस्वी ठरल्याचे या अहवालावरुन दिसून येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात वर्षभरात घडलेल्या गुन्ह्यांचा, पोलीसांच्या कामगिरीचा, गुन्हे उकलीचा लेखा-जोखा देण्यासाठी गुरुवारी वार्षिक पत्रकार परिषद आयोजित केली होती. या वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त सचिन गुंजाळ, पोलीस उपआयुक्त (मुख्यालय) संजयकुमार पाटील, परिमंडळ-2चे उपायुक्त अमित काळे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. यामध्ये पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी सादर केलेल्या वार्षिक अहवालात 2025 या वर्षभरात दाखल झालेल्या एकूण गुह्यांपैकी 80 टक्के गुह्यांचा पोलिसांनी छडा लावला आहे. विशेष म्हणजे शरीराविरुद्धच्या गंभीर गुह्यांमध्ये तपासाचे हे प्रमाण 99 टक्क्यांवर पोहोचले आहे. मालमत्तेविषयक गुह्यांच्या तपासातही मागील वर्षाच्या तुलनेत 5 टक्क्यांनी वाढ होऊन तो 57 टक्क्यांवर गेला आहे. पोलिसांनी चोरीला गेलेला 18.30 कोटींचा मुद्देमाल हस्तगत करून मूळ मालकांना परत केला आहे.
नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत पोलिसांनी 2025 या वर्षभरात 215 किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तब्बल 63 कोटी रुपये इतकी आहे. ड्रग्जची विक्री करणाऱ्या मुख्य साखळीवर (सफ्लाय चैन) हल्ला चढवत पोलिसांनी 10 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज नष्ट केले आहेत. त्याचप्रमाणे सायबर गुन्हेगारीचे मोठे आव्हान पेलताना नवी मुंबई पोलिसांनी गोल्डन अवरमध्ये तातडीने मिळालेल्या तक्रारींमुळे नागरिकांचे सुमारे 10 कोटी रुपये बँक खात्यात गोठवले आहेत. 1930 या हेल्पलाइनचा प्रभावी वापर केल्याने शेकडो नागरिकांची आर्थिक फसवणूक टळली आहे.
शहराच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत 1000 हून अधिक बेकायदेशीररीत्या राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा शोध घेऊन त्यांना मायदेशी पाठवण्याची (डिपोर्टेशन) प्रक्रिया पुर्ण केली आहे. यात 300 नायजेरियन आणि 618 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी कारवाई, अवैध धंद्यांवर नियंत्रण, वाहतूक शिस्तीचे पालन, तसेच नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम राबविण्यात नवी मुंबई पोलीसांनी प्रभावी कामगिरी केली आहे.
सन 2025 मध्ये दाखल एकुण गुन्ह्यांची संख्या 7835 इतकी असून 6276 गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. दाखल गुन्हे व उघडकीस आणलेल्या गुन्ह्यांचे वर्गीकरण पुढीलप्रमाणे शरीराविरूध्द गुन्हे:- एकुण गुन्हे 794, उघड गुन्हे 783, गुन्हे उघडकीचे प्रमाण 99%, मालमत्तेविषयक गुन्हे:- एकुण गुन्हे 2331, उघड गुन्हे 1321, गुन्हे उघडकीचे प्रमाण 57%, आर्थिक फसवणुकीचे गुन्हे:- एकुण गुन्हे 913, उघड गुन्हे 600, गुन्हे उघडकीचे प्रमाण 66 %, महिला विषयक गुन्हे:- एकुण गुन्हे 748, उघड गुन्हे 739, गुन्हे उघडकीचे प्रमाण 99% आहे. तसेच इतर गुन्ह्यामध्ये एकुण गुन्हे 1674 असून त्यापैकी 1459 गुन्हे उघडकीस आणले असून त्याचे प्रमाण 87 % इतके आहे. अमंलबजावणी गुन्हे:- एकुण गुन्हे 1375, उघड गुन्हे 1374, गुन्हे उघडकीचे प्रमाण 100% असे आहे. विशेष म्हणजे वर्ष 2024 मध्ये या स्वरूपाचे गुन्हे उघडक़ीस आणण्याचे प्रमाण हे 100 % इतकेच होते.
नवी मुंबई पोलीस दलासाठी 2025 हे वर्ष आव्हानात्मक असले तरी आम्ही अनेक आघाडांवर यश मिळवले आहे. 80 टक्के गुन्हे उकल करणे आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुह्यात 99 टक्के कामगिरी करणे, हे आमच्या टीमच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. महिलांची सुरक्षा ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि ती यापुढेही राहील. सायबर गुन्ह्यात आम्ही गोल्डन अवरवर लक्ष केंद्रित करुन कोटयवधी रुपये वाचवले आहेत. नवी मुंबईला नशामुक्त करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागरिकांनी ही सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करावे. - मिलिंद भारंबे, पोलीस आयुक्त नवी मुंबई
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai