पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे पर्यंतची डेडलाईन
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 29, 2021
- 607
नवी मुंबई ः मागील वर्षी पावसाळी कालावधीत आलेल्या अडचणींपासून बोध घेऊन यावर्षी त्यादृष्टीने आत्ताच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर द्यावा असे निर्देशित करीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी पावसाळापूर्व कामांसाठी 15 मे पर्यंतची डेड लाईन दिली. मान्सून 2021 पावसाळापूर्व तयारीच्या अनुषंगाने विविध प्राधिकरणांसोबत कोव्हीड काळ लक्षात घेता व्हिडीओ कॉन्फरन्सींगव्दारे आयोजित शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीप्रसंगी समितीचे अध्यक्ष म्हणून आयुक्तांनी कोणतीही आपत्ती सांगून येत नसल्याने कायम सतर्क रहावे व परस्पर समन्वय राखून आपत्ती उद्भवूच नये याकरिता पूर्व नियोजन करावे अशा सूचना दिल्या.
सध्या शहरात सुरु असलेल्या स्थापत्य विकास कामांची सद्यस्थिती जाणून घेत आयुक्तांनी 15 मे पर्यंत जलद गतीने कामे पूर्ण करावीत असे निर्देशित केले व पावसाळी कालावधीत सुरु ठेवणे आवश्यक असलेल्या स्थापत्य कामांच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य प्रकारे बॅरेकेटींग लावण्यात यावेत असे सूचित केले. यामध्ये हलगर्जीपणा केल्याचे निदर्शनास आल्यास कंत्राटदारासह संबंधित अधिकार्यांवरही जबाबदारी निश्चित करण्यात येईल असे आयुक्तांनी स्पष्ट शब्दात आदेशीत केले. रस्ते खड्डेमुक्त असलेच पाहिजेत याकडे काटेकोर लक्ष देण्याचे निर्देश देतानाच पावसाळी कालावधीत कुठलाही रस्ता हा वीजपुरवठा खंडीत झाला यासारख्या अत्यावश्यक कारणांशिवाय खोदलाच जाऊ नये याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. महानगरपालिकेप्रमाणेच सार्वजनिक बांधकाम विभाग व एम.आय.डी.सी. प्राधिकरणाच्या अभियांत्रिकी विभागालाही या सर्व सूचना देण्यात आल्या. मलनि:स्सारण वाहिन्यांची विहीत वेळेत सफाई पूर्ण व्हावी तसेच त्यावरील झाकणे सुव्यवस्थित असल्याची खातरजमा करून घ्यावी असे सूचित केले. अशाच प्रकारे होल्डींग पाँडवरील फ्लॅपगेट दुरुस्ती आणि पंपींग स्टेशन दुरुस्तीची कामे तत्परतेने करून घ्यावीत अशाही सूचना करण्यात आल्या. ज्या ठिकाणी पाणी साचू शकते अशी माहिती असलेली संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन तेथे पुरेशा प्रमाणात पंपींग सुविधा आधीपासूनच उपलब्ध करून ठेवावी असेही सूचित करण्यात आले. दरड / घनमाती कोसळण्याची संभाव्य ठिकाणे तसेच नैसर्गिक नाल्यांची ठिकाणे आधीच हेरून ठेऊन त्याठिकाणच्या झोपड्या / घरे स्थलांतरीत करावीत तसेच नाले स्वच्छ रहावेत म्हणून प्रवाहात लावण्यात आलेल्या नेट्स पावसाळी कालावधीत काढून ठेवाव्यात अशाही सूचना देण्यात आल्या.
पावसाळी काळात सिग्नल यंत्रणा नियमित कार्यान्वित राहील, सर्व पथदिवे सुरु राहतील याची खबरदारी घेण्याप्रमाणेच धोकादायक विद्युत खांब प्राधान्याने बदलून घ्यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे महावितरण कंपनीने उघड्या केबल, डिपीची झाकणे बंद असण्याची खबरदारी घ्यावी व दुरुस्ती करून घ्यावी अशा सूचना देण्यात आल्या. धोकादायक इमारतींची यादी तयार करून ती विहीत वेळेत जाहीर करण्याची कार्यवाही करावी असे अतिक्रमण विभागास केले. पावसाळी कालावधीत वेळेत कचरा उचलण्याकडे अधिक काटेकोर लक्ष द्यावे व घनकचरा व्यवस्थापन स्थळीही कचरा विल्हेवाटीबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात यावी असे आयुक्तांनी निर्देश दिले. पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे व कोणत्याही प्रकारे दूषीत होणार नाही याची काळजी घ्यावी असे सूचित करण्यात आले. पावसाळी कालावधीतील संभाव्य आजार लक्षात घेता महानगरपालिकेकडे आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवणे तसेच संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आणि जनजागृती करणेबाबत आयुक्तांनी महत्वाच्या सूचना केल्या.
25 मे पासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करावेत
महापालिका मुख्यालयात वर्षभर अहोरात्र सुरु असणार्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राप्रमाणेच पावसाळी कालावधीत बेलापूर, नेरुळ, वाशी, ऐरोली येथील अग्निशमन केंद्रांच्या ठिकाणी 25 मे पासून आपत्कालीन नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावेत तसेच आठही महापालिका विभाग कार्यालयात विभागीय नियंत्रण कक्ष सुरु करून या सर्व ठिकाणी आवश्यक साधनसामुग्री व उपकरणांसह मदत करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे असे आयुक्तांनी सूचित केले. 15 मे पर्यंत अडथळा आणणार्या झाडांच्या फांद्यांची आवश्यक तेवढ्याच प्रमाणात छाटणी करावी असे सूचित करण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या निवार्याकरीता शाळा व समाजमंदिरांचे विभाग कार्यालयांनी पूर्वनियोजन करावे व त्यांच्याकरीता आवश्यक अन्नधान्य साठा करून ठेवावा अशा प्रकारच्या विविध छोट्या छोट्या गोष्टींवरील महत्वाच्या सूचना आयुक्तांनी या बैठकीत दिल्या.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai