विमानतळ प्राधिकरण बांधकामांना देणार उंचीविषयक ना-हरकत प्रमाणपत्र
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 23, 2021
- 438
नैना क्षेत्रात वैध प्रमाणपत्र असणार्यांना सिडको देणार बांधकाम परवानगी
नवी मुंबई ः सिडको महामंडळाकडून नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) येथील ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीबाबतचे वैध ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा बांधकामांना परवानगी देण्यात येणार आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या ना-हरकत प्रमाणपत्रात नमूद अनुज्ञेय उंचीपर्यंतची बांधकामे विकासकांना करता येणार आहेत. त्यामुळे आता नैना क्षेत्रातील बांधकामांना चालना मिळण्याची शक्यता आहे.
सिडकोकडून नवी मुंबईच्या रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात 1160 हेक्टरवर आंतरराष्ट्रीय विमानतळ साकारण्यात येत आहे. सदर विमानतळामुळे नजीकच्या नवी मुंबई तसेच नैना क्षेत्रातील बांधकामांच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. यामुळे अनेक बांधकाम प्रकल्पांना, विशेष नियोजन प्राधिकरण या नात्याने, सिडकोकडून बांधकाम ना-हरकत प्रमाणपत्र मिळाले असले तरी त्यांचा विकास रखडला होता. या पार्श्वभूमीवर सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी पुढाकार घेऊन भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ विकसित करणारी सवलतधारक कंपनी नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या सहकार्याने या प्रश्नाबाबत मार्ग काढला. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सिडको, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लि. यांच्या प्रतिनिधींच्या अनेक बैठका झाल्या. यानंतर ज्या बांधकाम प्रकल्पांना भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून उंचीविषयक ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे व जे वैध आहे, अशा बांधकामांना बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला.
ज्या विकासकांकडे बांधकाम उंचीबाबतची वैध प्रमाणपत्रे आहेत त्यांना लवकरच सिडकोकडून बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र आणि भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबई आणि नैना क्षेत्रांतील बांधकाम प्रकल्पांसमोरचा अडथळा दूर होऊन या भागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे, संबंधित विकासक व नागरिक यांनाही या निर्णयामुळे निश्चितच दिलासा मिळणार आहे.- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai