ठाण्यातील भ्याड हल्ल्याचा उरण-पनवेलमध्ये निषेध
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 01, 2021
- 612
कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन; आयुक्तांना निवेदन
पनवेल : अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना एका फेरिवाल्याने ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात पिंपळे यांच्यासह अंगरक्षकांच्या हाताची बोटे तुटली. या गंभीर कृत्याचा निषेध करण्यासाठी मंगळवारी पनवेल महापालिका कर्मचार्यांनी व उरण परिषदेच्या कर्मचार्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले.
ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या सोमवारी (दि. 30) अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत असताना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचा फेरीवाला अमरजीत यादव याने पिंपळे व त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला केला. यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली. या गंभीर कृत्याचा निषेध करण्यासाठी, तसेच या घटनेतील गुन्हेगारांवर तत्काळ खटला चालवून, गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्यांनी आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य मुख्याधिकारी संघटना मुंबईचे अध्यक्ष गणेश देशमुख यांना निवेदन दिले. कर्तव्य बजावत असताना गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा अधिकार्यांवर हल्ले करतात, तेव्हा अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे, तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याविरोधात संघटित निषेध करण्यासाठी अधिकारी व कर्मचार्यांनी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन केले. या वेळी उपायुक्त विठ्ठल डाके, सचिन पवार, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, मनपा कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल जाधव, शैलेश गायकवाड, सुनील मानकामे, तसेच मोठ्या संख्येने महिला कर्मचारीही उपस्थित होत्या.
उरण नगर परिषदेच्या कर्मचार्यांनीही एक दिवसाचे कामबंद आंदोलन करून या बाबीचा सर्वच स्तरातून जाहीर निषेध केला. हा भ्याड हल्ला करणार्या इसमावर जलदगती न्यायालयासमोर सुनावणी होऊन या इसमास कडक शिक्षा व्हावी, अशा मागणीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रायगड जिल्हाधिकार्यांमार्फत पाठवण्यात आले असून, त्या निवेदनाची प्रत उरण नगर परिषदेच्या अध्यक्षा व मुख्याधिकार्यांना देण्यात आली असल्याचे म्युनिसिपल एप्लॉईज युनियनचे अध्यक्ष रमेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष पवार व सचिव नरेंद्र उभारे यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai