डॉ. आंबेडकर स्मारकाची कामे गुणवत्ता राखून करा
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 09, 2021
- 439
30 सप्टेंबरपर्यत कामे पुर्ण करण्याचे आयुक्तांचे आदेश
नवी मुंबई ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे सुरु असलेले काम 7 सप्टेंबरच्या बैठकीत यापूर्वीच निर्देशित केल्याप्रमाणे गुणवत्ता राखत 30 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे. हे स्मारक प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब असल्याचे लक्षात घेत ते आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे व्हावे याची प्रत्येक गोष्टीत काळजी घ्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.
ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 सप्टेंबर रोजी केलेल्या स्मारकाच्या पाहणी दौर्यात 6 डिसेंबर या महापरिनिर्वाणदिनी स्मारक नागरिकांसाठी खुले व्हावे असे सूचित केले होते. त्यानुसार आयुक्त अभिजीत बांगर यांचे या कामावर बारकाईने लक्ष असून यातील कामांचा नियमित आढावा घेतला जात आहे. शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते व संबंधित अधिकारी, वास्तुविशारद आणि स्मारकाची विविध कामे करणारे कंत्राटदार यांची संयुक्त बैठक घेत आयुक्तांनी स्मारकातील कामांचा सर्वांगीण आढावा घेतला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सेक्टर 15 ऐरोली येथे उभारले जात असलेले स्मारक जागतिक दर्जाचे व्हावे या दृष्टीने प्रत्येक बाब त्या गुणवत्तेची असावी याची काटेकोर दक्षता घ्यावी असे अभियांत्रिकी विभागाला निर्देशित करतानाच आयुक्तांनी प्रत्येक कामात सध्या उपलब्ध असलेले सर्वोत्तम तंत्रज्ञान उपयोगात आणावे असे काम करणार्या कंत्राटदारांना आदेश दिले. स्मारकाच्या कामात कोणत्याही प्रकारची तडजोड खपवून घेतली जाणार नाही असाही इशारा आयुक्तांनी याप्रसंगी दिला.
स्मारकाचा बाह्य भाग ज्याप्रमाणे आकर्षक असेल त्याचप्रमाणे अंतर्भागातही प्रसन्न वाटेल अशाप्रकारे इंटिरियरची कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. त्याठिकाणी विविध कार्यक्रमांसाठी असलेले सभागृह उच्चतम साऊंड सिस्टीमसह इतर सुविधांसह परिपूर्ण असावे असेही सूचित करण्यात आले. स्मारकामधील विपश्यना केंद्र अतिशय महत्वाचे असून त्याच्या अंतर्भागात ध्यानासाठी पूर्णत: शांतता राहील याकामाकडे बारकाईने लक्ष देण्याचे स्पष्ट निर्देश आयुक्तांमार्फत देण्यात आले.
स्मारकात असणार्या ग्रंथालयाचे इंटिरियर व सजावट वेगळेपण जपणारी असावी असे सूचित करतानाच तेथेच बसून वाचनाचीही सोय असणारी अभ्यासिका असावी असेही निर्देशित करण्यात आले. स्मारकातील विशेष दालनात आभासी वास्तवदर्शी चित्रणाव्दारे बाबासाहेबांचे भाषण दाखविण्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेबाबत विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai