दिवाळीनंतर लसीकरणाला उत्साही प्रतिसाद
- by Aajchi Navi Mumbai
- Nov 09, 2021
- 651
नवी मुंबई ः कोव्हीड लसीकरणात पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण करून घेऊन आता दुसर्या डोसच्या 57 टक्के झालेल्या लसीकरणाला अधिक वेग देण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेने योग्य नियोजन केलेले आहे. दिवाळी उत्सवाच्या कालावधीतही पालिकेच्या चारही रूग्णालयांतील लसीकरण केंद्रे दिवाळीच्या दिवसात सुरू ठेवण्यात आली होती. आता दिवाळी सणानंतर पुन्हा एकवार नवी मुंबईकर नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसून आले आहे.
दिवाळी सणानंतरच्या सोमवारी पहिल्या दिवसात महानगरपालिका व खाजगी अशा सर्वच लसीकरण केंद्रांवर नागरिक सकाळपासून उपस्थित होते. यामध्ये सोमवारी 1815 नागरिकांनी पहिला तसेच 7945 नागरिकांनी दुसरा डोस घेतला. अशाप्रकारे सोमवारी एकूण 9760 नागरिकांचे लसीकरण झाले. दिवाळीच्या दिवसातही वाशी, नेरूळ, ऐरोली व तुर्भे रूग्णालयांमधील लसीकरण केंद्रे सुरू ठेवण्यात आली होती. त्यामध्ये 4 नोव्हेंबर या नरकचतुर्दशी व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी 290 नागरिकांनी, 5 नोव्हेंबर या बलिप्रतिपदा व दीपावली पाडव्याच्या दिवशी 760 नागरिकांनी तसेच 6 नोव्हेंबर या भाऊबीजेच्या दिवशी 1203 नागरिकांनी लसीकरण करून घेतले. रविवारी 7 नोव्हेंबर या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही 819 नागरिकांनी लसीचे डोस घेतले. अशाप्रकारे दिपोत्सव कालावधीत एकूण 3072 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. दिवाळी सणाच्या दिवसात लस घेऊ इच्छिणार्या नागरिकांची असुविधा होऊ नये म्हणून 4 रूग्णालयात लसीकरण केंद्रे सुरू ठेवल्याबद्दल अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. दिवाळी सणानंतर लसीकरण केंद्रांवरील नागरिकांच्या संख्येत वाढ झालेली दिसून येत आहे. आत्तापर्यंत 11 लाख 29 हजार 547 नागरिकांनी कोव्हीड लसीचा पहिला डोस घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 6 लाख 32 हजार 299 नागरिकांनी कोव्हीड लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. म्हणजेच 57.11 टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला असून सर्व नागरिकांनी विहित वेळेत दुसरा डोस घ्यावा याकरिता महानगरपालिका विविध माध्यमांतून प्रयत्नशील आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai