दोन टप्प्यात 350.17 हेक्टर कांदळवन वन विभागाकडे
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 22, 2022
- 617
सिडकोकडून वनविभागाला कांदळवनांचे हस्तांतरण
नवी मुंबई ः सिडकोकडून 21 फेब्रुवारी 2022 रोजी दुसर्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या हस्ते एम आदर्श रेड्डी, विभागीय वन अधिकारी, मुंबई कांदळवन संधारण घटक यांना सदर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले. या आधीच्या पहिल्या टप्प्यात सिडकोने आपल्या अधिकारक्षेत्रातील 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तातंरण केले आहे. कांदळवनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन, कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सिडकोकडून दोन टप्प्यात दोन टप्प्यात 350.17 हेक्टर कांदळवनांचे हस्तातंरण करण्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील कांदळवनांचे संरक्षण आणि जतन व्हावे याकरिता संबंधित शासन संस्था व प्राधिकरणांकडून आपल्या अधिकारक्षेत्रातील कांदळवन क्षेत्रांचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडे करण्यात येत आहे. सिडकोतर्फे यापूर्वी पहिल्या टप्प्यात पनवेल तालुक्यातील कामोठे येथील 134 हेक्टर, पनवेल येथील 38 हेक्टर व कोल्हे-खार येथील 109 हेक्टर, अशा एकूण 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे ऑगस्ट 2021 मध्ये वन विभागाकडे हस्तांतरण करण्यात आले होते. दुसर्या टप्प्यात सिडकोकडून पनवेल तालुक्यातील उलवे येथील 24.20 हेक्टर, वहाळमधील 3.15 हेक्टर, वाघिवलीतील 39.94 हेक्टर आणि सोनखारमधील 0.75 हेक्टर, अशा एकूण 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण वन विभागाला करण्यात आले. त्याचप्रमाणे सिडकोने कांदळवन कक्षाच्या सहाय्याने 370 हेक्टरवर खारफुटीची लागवड केली आहे. याचबरोबर मॅन्ग्रोव्ह इंटरप्रिटेशन सेलदेखील ऐरोली येथे आहे.
जमिनीची धूप होण्यापासून वाचवण्यासह पुराचे पाणी व वादळाला अटकाव करण्यामध्ये कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच अनेक पशू-पक्षी व जलचरांचा कांदळवनांमध्ये अधिवास असतो. हे लक्षात घेऊन कांदळवनांना पुरेसे वैधानिक संरक्षण प्राप्त व्हावे म्हणून कांदळवन क्षेत्र अधिसूचित करून, सिडकोकडून उपरोक्त कांदळवन क्षेत्राचा ताबा कांदळवन कक्षाला देण्यात आला.
सिडको पर्यावरणाचे जतन व शाश्वत विकास करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. नवी मुंबईचे नियोजन करताना, सिडकोने उद्यान, क्रीडांगणे आणि एनडीझेडसह सुमारे 40% क्षेत्र हरितक्षेत्रासाठी ठेवले होते. महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत सिडकोने अंदाजे 2000 हेक्टर जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे. त्यामुळे कांदळवनांच्या जमिनींचे एवढे मोठे क्षेत्र हस्तांतरण करणारी सिडको ही एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव सरकारी संस्था आहे. -डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai