माथाडींचे कामबंद आंदोलन
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 22, 2022
- 726
जास्त वजनाचा माल न उचलण्याचा निर्णय ; सात कोटींच्या मालाचे नुकसान
नवी मुंबई : 50 किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोणी न उचलण्यावरुन गेले दिड-दोन वर्षापासून एपीएमसीतील माथाडी कामगार व व्यापारी यांच्यात वाद सुरु आहेत. जास्त वजनाच्या गोणी भरु नयेत अशी वारंवार मागणी असताना त्याची अमंलबजावणी होत नसल्याने सोमवारी माथाडी कामगारांनी कांदा-बटाटा बाजारात कामबंद आंदोलन केले. त्यामुळे बाजारात 299 गाडी शेतमाल पडून राहिला. यामुळे येथील व्यवहार ठप्प झाला आहे. त्यामुळे 7 कोटींच्या मालाचे नुकसान झाले आहे.
50 किलोपेक्षा अतिरिक्त वजनाची हाताळणीवरून व्यापारी आणि माथाडी कामगार यांच्यात वाद सुरू आहे. माथाडी कामगार यांनी 50 किलोहून अधिक वजनाच्या गोणी उचलण्यास मनाई करीत आहेत तर राज्यातील सर्व बाजार समितीत हा निर्णय लागू करावा तेव्हाच इथे या नियमांची अंमलबजावणी होईल अशी भूमिका व्यापार्यांनी घेतली आहे. मागील आठवड्यात पुन्हा माथाडी कामगार यांनी 50 किलोपेक्षा अतिरिक्त वजनाची हाताळणी थांबवली होती. त्यामुळे व्यापारी वर्गाने सोमवारी व्यवसाय बंद आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला होता. मात्र माथाडी युनियन आणि व्यापारी यांच्यात पुन्हा बैठक घेऊन चर्चेअंती व्यापार्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला. माथाडी यांनी अतिरिक्त वजन हाताळणीला संमती दर्शवली होती. मात्र सोमवारी पुन्हा माथाडी कामगार यांनी अचानक कामबंद आंदोलन सुरू करत कांदा-बटाटा बाजारातील प्रशासकीय इमारतीत ठिय्या आंदोलन केले. शनिवारी आणि रविवारी बाजार बंद असल्याने बाजारात सोमवारी जादा 299 गाड्यांची आवक झाली होती. मात्र माथाडी कामगार यांनी आंदोलन सुरू केल्याने हा शेतमाल गाड्यांमध्ये पडून आहे. पावसामुळे कांदा खराब येत असून बहुतांश कांदा आतून ओला आहे. तो गोणीत पडून राहिल्याने मोठा फटका शेतकर्यांना बसला आहे. तर बाजार समितीच्या सेवाशुल्कालाही फटका बसला आहे.
- माहिती न दिल्याने आंदोलन
व्यापार्यांनी माथाडी कामगार यांची नाहक बदनामी करीत सोमवारी व्यवसाय बंदचा इशारा दिला होता. मात्र आंदोलन मागे घेतले होते. त्याची माहिती, पत्रक माथाडी कामगार युनियन यांना दिले नाही. त्यामुळे माथाडी कामगार यांनी कामबंद आंदोलन केले. सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास माथाडी कामगारांनी बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीला घेराव घालत निषेध व्यक्त केला. अतिरिक्त सचिव यांच्या दालनात बसून ठिय्या आंदोलन करीत घोषणाबाजी केली. - ...तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील
सर्व कामगारांची माथाडी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी कांदा-बटाटा मार्केट लिलावगृह येथे सभा घेतली. यात व्यापारी जोपर्यंत लेखी स्वरूपात माथाडी कामगारांची माफी मागत नाहीत तसेच बाजार समिती जादा वजनाचा माल मागविणार्या व्यापार्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असे सभेत जाहीर करण्यात आले.
व्यापार्यांनी मागील आठवड्यात माथाडी कामगारांचे नाव पुढे करून व्यवसाय बंदचा इशारा दिला होता. व्यापारी यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय प्रसिद्ध केला नाही, ना कोणते परिपत्रक काढले. त्यामुळे आम्ही कामबंद आंदोलन केले आहे. - नरेंद्र पाटील, माथाडी नेते
माथाडी कामगार मध्येच 50 किलोपेक्षा जादा वजन उचलण्यास मनाई करीत आहेत. त्यामुळे व्यापार बंद आंदोलनाचा निर्णय जाहीर केला होता, परंतु तो मागे घेण्यात आला. त्याबाबत माहितीही देण्यात आली होती. -अशोक वाळुंज, संचालक, कांदा-बटाटा बाजार समिती
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai