पार्किंग धोरण राबवून नवी मुंबईकरांना न्याय द्या
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2022
- 1054
समाजसेवक सुधीर दाणी यांची मागणी ; उपाययोजनांसाठी संबंधित प्रशासनाला निवेदन
नवी मुंबई ः स्मार्ट शहरात पार्किंगचा प्रश्न आ वासून उभा असताना त्यावर ठोस उपाययोजना करुन नवी मुंबईकरांना न्याय देण्याऐवजी नो पार्किंग आणि टोईंगच्या नावाखाली त्यांची आर्थिक लूट सर्रासपणे संबंधित विभागाकडून सुरु आहे. ‘वाहने पार्क करू नका’ हा अधिकार बजावताना ‘वाहने येथे पार्क करा’ हे कर्तव्य पार पाडावे जणेकरुन नवी मुंबईकरांना पार्किंगच्या समस्येतून थोडा का होईना दिलासा मिळेल अशी मागणी समाजसेवक सुधीर दाणी यांनी पोलीस आयुक्त, वाहतुक विभाग व सिडको प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याकडेही लक्ष वेधले आहे.
नवी मुंबई शहर वसवताना सिडकोने पार्किंगसाठी नियोजन न केल्याने वाढत्या लोकसंख्येप्रमाणेच दिवसेंदिवस पार्किंगची समस्याही उग्र रुप धारण करत आहेत. पार्किंग धोरण राबविण्यात शहरांचे शिल्पकार असणारी सिडको व गेली 3 दशके नवी मुंबईचा कारभार पाहणारी पालिका ही दोन्ही प्राधिकरणे अपयशी ठरल्याचे दिसत आहे. अधिकार्यांमध्ये असणार्या दूरदृष्टिच्या अभावाची किंमत आता सामान्य नागरिकांना भोगावी लागत आहे. एकीकडे झेरॉक्स काढून येईपर्यंत वा मेडिकल मधून औषध घेऊन येईपर्यंत वाहन उचलून नेले जाते. तर दूसरीकडे भररस्त्यात पे अँड पार्क सुरु केले जाते. मग भररस्त्यात पैसे आकारुन पार्किंग करताना वाहतुकीस अडथळा होत नाही का? असा सवाल दाणी यांनी उपस्थित केला आहे. तसेच नो पार्किंग मधील वाहनांवर कारवाई करताना ‘सापत्नपणाची’ वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दुचाकीला उचलून नेताना त्याच ठिकाणी उभ्या असणार्या चारचाकी वाहनांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते. त्यात ही समोर ‘अमुक तमुक’ असे बोर्ड्स असणारे, विविध राजकीय पक्षांचे स्टिकर्स असणार्या वाहनांना हात लावला जात नसल्याने हे दुट्टपी धोरण कशाचे द्योतक समजायचे ? पालिका आणि वाहतूक विभाग कोणत्या नियमानुसार /कायदयानुसार ‘पे अँड पार्किंगचे धोरण’ राबवते हे एकदा प्रशासनाने जनतेसमोर मांडावे असे त्यांनी नमुद केले आहे. कोकणभवन, सिडको सह बहुतांश बँका, एमटीएनल, अन्य सरकारी कार्यालये आपल्या ग्राहकांना देखील त्यांच्या परिसरात पार्किंगची सुविधा असून देखील आत येऊ देत नाहीत. बाहेर पार्कींगची सुविधा नसल्याने रस्त्यावर वाहन पार्क करण्याशिवाय वाहनचालकांकडे अन्य पर्याय उरत नाही. सामान्य नागरिकांवर कायद्याचा बडगा उचलत तातडीने कारवाई करणारी यंत्रणा पोलीस आयुक्त कार्यालयासमोरील, पोलीस स्टेशन समोरील अस्ताव्यस्त लावलेली, फुटपाथवर लावलेल्या पार्किंगकडे मात्र डोळेझाक करताना दिसते याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे. पार्किंगचे बोर्ड ठळकपणे लावावेत, सम-विषम पार्किंग धोरण राबवावे, नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्तांनी आगामी आठ दिवसांसाठी टोईंग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे त्या धर्तीवर नवी मुंबई आयुक्त व वाहतूक विभागाने देखील पार्किंगचे धोरण राबवून नवी मुंबईतील नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याची मागणी दाणी यांनी केली आहे.
दाणी यांनी केलेल्या सूचना
- पालिकेने इमारतींना परवानगी देताना ‘फ्लॅट तितके पार्किंग अनिवार्य’ हे धोरण राबवावे
- दुकाने, आस्थापने, हॉटेल्स, बँका, सरकारी कार्यालये, मॉल्स, हॉस्पिटल्स यांनी पार्किंग व्यवस्था अनिवार्य केली तरच परवाना द्यावा
- आधी पार्किंगची व्यवस्था निर्माण करा त्यानंतरच अन्य ठिकाणी अवैद्य रीतीने पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करू अशी भुमिका घेऊन वाहतुक विभागानेही नियोजित प्राधिकरणाकडे पाठपुरावा करावा
- नो पार्किंग झोनमध्ये लाल पट्टे मारावेत आणि पार्किंग झोनमध्ये पांढरे पट्टे मारावेत
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai