शहर स्वच्छतेत स्वयंपरीक्षण करा
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2022
- 616
पालिका आयुक्तांचे संबंधित अधिकार्यांना निर्देश
नवी मुंबई ः नवी मुंबई हे स्वच्छतेबाबत मोठ्या क्षमता असणारे शहर असल्याने विविध स्तरांतून सर्वोत्तम गुणवत्तेची नेहमीच अपेक्षा केली जाते. त्यादृष्टीने आपण अधिक सतर्कतेने काम करण्याची गरज असून स्वच्छतेच्या निकषांबाबत कोणताही निष्काळजीपणा अपेक्षित नाही व तो चालणार नाही असे स्पष्ट करीत स्वच्छ सर्वेक्षण 2022 च्या परीक्षणाला सुरूवात होण्याच्या उंबरठ्यावर असताना अधिक काटेकोर राहून देशातील प्रथम क्रमांकाचे मानांकन संपादन करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज रहा असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्वच्छताविषयक आढावा बैठकीप्रसंगी दिले.
नागरिकांमार्फत घरांमध्येच ओला, सुका व घरगुती घातक असा कचरा वेगवेगळा ठेवला जाणे व महानगरपालिकेच्या कचरा गाड्यांमध्येही तो वेगवेगळा देणे अनिवार्य आहे. ज्या भागात अद्यापही कचरा वर्गीकरणामध्ये काही कमतरता आहेत त्याठिकाणी नागरिकांपर्यंत पोहचून अधिक प्रभावीपणे काम करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले. कचरा वर्गीकरणाचे प्रमाण तपासतानाच कचरा गाड्यांमधून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेला जाणारा कचरा तीन प्रकारे वर्गीकृत असतो याविषयीदेखील खातरजमा करण्याचे तसेच कचरा गाड्यांनुसार त्याबाबतची आकडेवारी आपल्याकडे नियमित सादर करण्याचे आयुक्तांनी आदेशीत केले. मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होत असलेल्या सोसायट्या, संस्था अशा ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन नियमावलीनुसार राबविले जात असलेले ओल्या कचर्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प नियमितपणे कार्यान्वित असल्याबाबतचीही खातरजमा करून घ्यावी असेही निर्देश आयुक्तांनी केले. ज्या व्यावसायिक भागामध्ये दिवसातून दोन वेळा रस्ते सफाई केली जाते त्या ठिकाणी त्याबाबतच्या माहितीचे फलक रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावले असल्याची खातरजमा करून घ्यावी असेही आयुक्तांनी सूचित केले. तलावांसारख्या जलस्त्रोतांच्या ठिकाणी जलाशयाच्या पृष्ठभागावर कोणत्याही प्रकारचा कचरा तरंगता राहणार नाही याबाबत सुरु केलेली कार्यवाही नियमितपणे सुरु ठेवावी. डेब्रीज नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी कार्यान्वित असलेल्या सी अँड वेस्ट प्लान्टवर नेऊन प्रक्रिया करण्याबाबत कार्यवाही करणे तसेच नागरिकांना याची माहिती मिळावी याकरिता तशा प्रकारची व्यापक स्वरुपात जनजागृती करावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. घरातच ओल्या कचर्यापासून खत निर्मिती करण्यामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी पुढाकार घ्यावा यादृष्टीने नागरिकांपर्यंत पोहचून त्यांना यासाठी प्रोत्साहित करण्याबाबत विभागीय पातळीवर प्रभावीपणे मोहीम राबवावी असेही आयुक्तांनी निर्देश दिले. सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांच्या स्वच्छतेत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा दूर्लक्षित केला जाणार नाही असे आयुक्तांमार्फत स्पष्ट करण्यात आले. शहरात व्यापक प्रमाणात झालेल्या सुशोभिकरण कामांमुळे शहराचे रूप बदलले असल्याचे चांगले अभिप्राय नागरिकांकडून व प्रवाशांकडून प्राप्त होत असून त्या कामांना अंतिमत: वेग द्यावा असे आयुक्तांनी निर्देशित केले.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील प्रत्येक दुकानाच्या बाहेर दुकानदाराने कचर्याचे डबे ठेवणे बंधनकारक असून तशा प्रकारची खात्री विभाग अधिकारी यांनी करून घ्यावी व या तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी निर्देशित केले. स्वच्छ सर्वेक्षणामधील 14 मुद्दयांच्या अनुषंगाने बनविण्यात आलेल्या चेकलिस्टनुसार कार्यवाही होत असल्याबाबतची दैनंदिन तपासणी करावी व त्यामध्ये जाणवणार्या त्रुटींबाबत तातडीने संबंधीत अधिकार्यांना माहिती द्यावी व त्यामध्ये त्वरित सुधारणा करून घ्याव्यात अशा प्रकारचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले. विभाग कार्यालय पातळीवर तसेच मुख्यालय पातळीवरून स्वच्छतेशी निगडीत बाबींची अधिकारी, कर्मचारीनिहाय जबाबदारी द्यावी व त्याचे पालन होण्याकडे काटेकोर लक्ष द्यावे असेही निर्देश आयुक्तांनी दिले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai