गृहनिर्माण योजनेची सोडत संपन्न
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 11, 2022
- 443
नवी मुंबई ः सिडकोतर्फे 26 जानेवारी 2022 रोजी प्रारंभ करण्यात आलेल्या या योजनेंतर्गत सुरुवातीस 5,730 सदनिका तळोजा नोडमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यानंतर अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून द्रोणागिरी, घणसोली, कळंबोली, खारघर आणि तळोजा नोडमधील आणखीन काही रिक्त सदनिकांची भर घालून एकूण 6,508 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या. एकूण 6,508 घरांपैकी 1,905 घरे ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि 4,603 सदनिका ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.
सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पुणे स्थित प्रोबेटी सॉफ्ट या नामांकित कंपनीकडून विकसित करण्यात आली आहे. सदर प्रणाली ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणार्या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करून घेतले जाते. तसेच सोडती दरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक पद्धतीने सरमिसळ करण्यात येते. अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात येते. जानेवारी-2022 गृहनिर्माण योजनेच्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या अर्जदारांची यादी सिडकोच्या lottery.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सध्याच्या महागाई आणि मंदीच्या काळात सिडकोची परवडणार्या दरातील घरे ही सर्वसामान्य नागरिकांसाठी फायदेशीर ठरणारी आहेत, असे उद्गार एकनाथ शिंदे, मंत्री, नगर विकास यांनी काढले. सिडकोच्या जानेवारी-2022 गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीचा प्रारंभ एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते ऑनलाइन पद्धतीने करण्यात आला यावेळी त्यांनी दूरस्थ पद्धतीने आपला संदेश व्यक्त केला. या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, शशिकांत महावरकर, मुख्य दक्षता अधिकारी, फैयाज खान, महाव्यवस्थापक (गृहनिर्माण), सिडको यांसह सिडकोतील विभाग प्रमुख आणि अधिकारी दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai