पावसाळ्यातही खोदकामे
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 25, 2022
- 603
वृक्षछाटणीच्या फांद्या 3-4 दिवस पदपथांवर पडून
नवी मुंबई : मान्सूनपुर्व कामे 15 मे पर्यंत पुर्ण करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश असूनही जूनची 15 तारीख उलटून पावसाळा सुरू झाला तरी शहरात अनेक ठिकाणी पालिकेची खोदकामे, वृक्षछाटणी सुरूच असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक कामांची मुदत संपली असताना देखील कंत्राटदाराकडून संथगतीने सुरू ठेऊन रेटा ओढला जात आहे. त्यामुळे ही विकासकामे आहेत की, खोदकामे असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून 24 तास पाणी पुरवठ्यासाठी जलवाहिन्या टाकण्याचे काम ऐन पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेण्यात आल्याने ठाणे-बेलापूर मार्ग खोदून ठेवण्यात आला आहे. काही ठिकाणी पाईपलाईन टाकल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्या रस्त्यावर मातीचा भराव टाकून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीत दुचाकीने प्रवास करणार्या चालकांना खड्डेमय रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. तुर्भे नाका ते तुर्भे स्टोअर येथे उड्डाणपुलाच्या कामासाठी पावसाळ्यात पदपथ खोदण्याचे काम सुरू आहे. तर याच मार्गावर बेलापूरच्या दिशेने जाणार्या रस्त्यावर महावितरणकडून केबल आणि पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले आहे. ऐरोली, कोपरखैरणे या ठिकाणी अंतर्गत रस्त्यावर मलनि:सारण वाहिन्याचे काम मागील काही दिवसांपासून सुरू आहे. या ठिकाणी खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा विसर पालिकेला पडला आहे. सानपाडा, तुर्भे, बेलापूर या ठिकाणी मेट्रोचे काम सुरू असून त्याच मार्गालगत पालिकेकडूनही खोदकाम करण्यात आल्याने दुहेरी त्रास वाहनचालक आणि सर्व सामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे.
महापालिकेच्या माध्यमातून ऐन पावसाळ्याच्या तोंडावर विविध कामे सुरु करण्यात आल्याने खोदकामाबरोबरच मातीचा थर रस्त्यावर पसरल्याने अपघाताची शक्यता आहे. तसेच वृक्षछाटणीही उशिरा सुरु झाल्याने पावसाळ्यात वाढलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्याचे काम सुरु आहे. तसेच तोडेल्या फांद्या पदपथावर 3-4 दिवस तसेच पडून राहत आहे. वाशी, घणसोली, कोपरखैरणे परिसरातील पदपथांवर या झाडांच्या फांद्या, पाळापाचोळा तसाच राहिल्याने नागरिकांना यातून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. तसेच यावर पावसाचे पाणी पडल्याने ते कुजून दुर्गंधी येत असून पदपथही यामुळे निसटते होत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai