पालिका अधिकार्यांवर ‘प्रभु’ची अपार माया
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 10, 2022
- 714
गल्लीतील रस्त्यांसाठी महागड्या थर्मोप्लास्टचा आग्रह
नवी मुंबई ः महापालिका क्षेत्रात सध्या थर्मोप्लास्ट पेंट रस्त्यांना मारण्याचे फॅड आले आहे. त्यातून शहरातील गावठाण विभागातील छोटे रस्तेही सूटले नसून गल्लीबोळातील रस्त्यांनाही पालिका अधिकार्यांनी थर्मोप्लास्टची रंगसफेदी केली आहे. अंदाजपत्रक फुगवण्यासाठी व प्रभुंची अपार माया मिळवण्यासाठी अधिकार्यांनी हा गोरखधंदा सुरु केला असून त्याला स्थानिक लोकप्रतिनिधींची साथ असल्याचे बोलले जात आहे. या अभद्रयुतीवर पालिका आयुक्त कधी कारवाई करतात याकडे नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.
रस्त्याच्या कडा अंधारात व्यवस्थित दिसाव्यात त्याचबरोबर वाहन चालकांना लेन मधून गाडी चालवताना सुलभ व्हावी म्हणून राजमार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवर थर्मोप्लास्ट पेंट मारण्यात येतो. यापुर्वी थर्मोप्लास्ट पेंट ऐवजी सफेद ऑईल पेंट मारण्यात येत होता. थर्मोप्लास्ट पेंटवर गाडीचा प्रकाश पडला तर तो चमकत असल्याने जेथे अतिशय धुके असते तेथे या पट्ट्यांचा फायदा वाहनचालकांना होतो. त्यामुळे घाटात होणारे अपघात टाळण्यासाठी मदत होते. थर्मोप्लास्ट पेंट हे महागडे असल्याने त्याचा वापर कोणत्या मार्गांवर करावा याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाने सर्व विभागांना दिले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात मात्र रस्त्याच्या सौंर्द्यीकरणाच्या नावाखाली सध्या सर्वच रस्त्यांना महागड्या थर्मोप्लास्ट पेंटने रंगरंगोटी करण्यात येत आहे. शहरातील बहुतांशी रस्त्यांवर दुतर्फा वाहने उभी राहत असल्याने कडेला मारण्यात येत असलेल्या पट्टीचा खर्च वाया जात असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. तसेच 6 ते 9 मीटर रुंदीच्या रस्त्याच्या दोन्ही बाजुला या पट्ट्या मारण्यात येतात शिवाय रस्ता दुभाजक म्हणूनही थर्मोप्लास्ट पेंटची पट्टी मारण्यात येते. शहरातील गावठाणमधील 6 मीटर ते 3 मीटर च्या गल्लीतील रस्त्यालाही दुतर्फा रंगरंगोटी करण्यात येत आहे. नागरिकांच्या पैशाचा हा मोठा अपव्यय असल्याने पालिका आयुक्तांनी याबाबत काटेकोर निर्देश शहर अभियंता विभागाला देणे गरजेचे आहे.
- यह सब ‘प्रभु’ की माया
पालिकेत थर्मोप्लास्ट पेंट मारण्याच्या नावाखाली सुरु असलेला गोरखधंदा हा अधिकारी, ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्या अभद्रयुतीने सुरु आहे. दर तीन-चार महिन्यांनी रस्त्यांवर थर्मोप्लास्ट पेंटची रंगरंगोटी करण्यात येत असून प्रभुकडून आपल्याला अपार माया प्राप्त व्हावी म्हणून हा पालिका अधिकार्यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. यह सब ‘प्रभु’ की माया असल्याने महापालिका आयुक्त अभिजित बांगर याची दखल घेतील अशी अपेक्षा नवी मुंबईकर व्यक्त करत आहेत.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai