अनुभवसमृध्द पिढीचा गौरव
- by Aajchi Navi Mumbai
- Oct 04, 2022
- 570
नवी मुंबई ः दरवर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येते. मागील दोन वर्षे कोव्हीड 19 प्रभावीत कालावधीमुळे आयोजित करता न येऊ शकलेला ज्येष्ठ नागरिक दिनाचा समारंभ सोमवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार्या 232 ज्येष्ठ नागरिकांचा तसेच लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा 26 दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कोव्हीड कालावधीनंतर 2 वर्षांनी हा कार्यक्रम संपन्न होत असल्याने ज्येष्ठांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसत होता. ज्येष्ठांची विरंगुळा केंद्रे ही त्यांच्यासाठी एकत्र जमून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याचा मानसिक आधार असून सध्याच्या 27 विरंगुळा केंद्रांच्या संख्येत वाढ करावी अशी सूचना ऐरोली विधानसभा सदस्य आ.गणेश नाईक यांनी केली. त्याचप्रमाणे सहकार्याचा हात देण्यासाठी संपर्क क्रमांक असणारे मदत केंद्र सुरु करावे असेही त्यांनी सूचित केले. बेलापूर विधानसभा सदस्य आ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिक भवन अर्थात ओल्ड एज होमचे काम मार्गी लागले असून यामुळे आधार गमाविलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानपरिषद सदस्य आ. रमेश पाटील यांनी ज्येष्ठांनाही आपुलकी देणारे नवी मुंबई शहर आहे असा विशेष उल्लेख करीत ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनामार्फत राबविल्या जात असलेल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी सूचना केली. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याप्रसंगी बोलताना आयुक्त पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम असल्याने माझ्या आयुक्त म्हणून कामकाजाची सुरुवात ज्येष्ठांच्या आशीर्वादाने होते ही भाग्याची गोष्ट असल्याचे सांगत आरोग्य सुविधा व इतर बाबींमुळे आयुर्मान वाढत चालल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आजच्या काळातील विकेंद्रीत कुटुंब पद्धतीमुळे संवाद कमी झालेल्या जगात ज्येष्ठ नागरिकांना एकत्र येऊन आपल्या समवयस्क लोकांशी संवाद साधण्यासाठी विरंगुळा केंद्रे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी वयाची 75 वर्षे पूर्ण करणार्या 232 ज्येष्ठ नागरिकांचा तसेच लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत अशा 26 दाम्पत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे कॅरम (108 स्पर्धक), बुध्दीबळ (32 स्पर्धक), गायन (37 स्पर्धक), काव्यवाचन (19 स्पर्धक), वेशभुषा (8 स्पर्धक), कथाकथन (13 स्पर्धक), नाटिका (4 स्पर्धक), ब्रीझ (21 स्पर्धक) व निबंध (24 स्पर्धक) अशा विविध कलागुणदर्शनपर स्पर्धांमधील विजेत्या ज्येष्ठ नागरिकांचा पारितोषिक वितरण सोहळा यावेळी संपन्न झाला. तसेच यावेळी आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2023 ला सामोरे जाताना त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभव समृध्द सहकार्याने आपल्या शहराचे मानांकन उंचाविण्यासाठी अधिक जोमाने प्रयत्न करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात आला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai