रबाळेतील पालिका शाळेत कल्पक शिक्षणावर भर
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 03, 2023
- 491
रा.छ.शाहू महाराज विद्यालयात टॅबलॅब व ॲक्टिव्हिटी झोन हे नाविन्य उपक्रम
नवी मुंबई ः बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धतीतही आधुनिक बदल होत असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका शाळांतील विद्यार्थी आघाडीवर असावेत यादृष्टीने आंबेडकर नगर, रबाळे येथील महानगरपालिकेच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयात आयवा या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून उभारण्यात आलेल्या टॅबलॅब तसेच मनोरंजनातून शिक्षण ही अनोखी संकल्पना राबवित निर्माण करण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी झोन अशा दोन आगळ्या वेगळ्या उपक्रमांचा शुभारंभ नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी बोलताना सध्याच्या माहिती तंत्रज्ञानाला सुसंगत असे टॅबलॅब आणि ॲक्टिव्हिटी झोन हे दोन उपक्रम सुरु करून महानगरपालिका शाळांतील मुले स्मार्ट होतील यासाठी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल कौतुक करीत नमुंमपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी प्रयोगशील शिक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगितले. पाठ्यपुस्तक वाचून ज्या गोष्टी लक्षात रहात नाहीत त्या पाहिल्यामुळे अधिक लक्षात राहतात. ही गोष्ट नजरेसमोर ठेवून टॅबलॅब सारखा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेची पूर्तता करेल व त्यांना स्वयंपूर्ण बनवेल असा विश्वास आयुक्तांनी यावेळी व्यक्त केला. अशाच प्रकारे अत्यंत कल्पक रितीने मांडणी करण्यात आलेल्या ॲक्टिव्हिटी झोनमधील अनेक गोष्टी खेळता खेळता खुप काही शिकवतील असेही ते म्हणाले. या दोन्ही अत्यंत लाभदायक ठरणा-या सुविधांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असेही आयुक्तांनी यावेळी सांगितले.
हायवा कंपनीच्या वतीने सीएसआर अंतगर्त राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयास 40 अत्याधुनिक शैक्षणिक टॅब देण्यात आलेले असून शाळेत टॅबलॅब निर्माण करण्यात आलेली आहे. दर्जेदार आधुनिक शिक्षण देण्याच्या दृष्टीने हा अत्यंत उपयोगी उपक्रम असून डिजीटल लर्नीग टूल्स आणि कन्व्हेजिनियस पीएएल सॉफ्टवेअरव्दारे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने नव्या संकल्पना सोप्या पध्दतीने मांडणी करून समजाविल्या जातील अशी महिती हायवा कंपनीचे एमडी श्री.पंकज कपूर यांनी दिली. भारत सरकारच्या निपुण भारत या संकल्पनेचे टॅबलॅब हे मूर्त स्वरुप असून यामुळे महानगरपालिकेचे विद्यालय डिजीटल लर्नींग स्कूल मध्ये रुपांतरित होत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.माजी महापौर श्री. सुधाकर सोनवणे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अभ्यासासह क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात केलेल्या उज्वल कामगिरीचा आढावा घेताना हायवा कंपनीने पुढाकार घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सीएसआर निधीतून टॅबलॅब हा उपक्रम राबविल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्याचप्रमाणे टॅबलॅब आणि ॲक्टिव्हिटी झोन या दोन्ही उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य घरातील आमच्या मुलांना होईल याबद्दल समाधान व्यक्त केले.
ॲक्टिव्हिटी झोनमध्ये सापशिडी, बुध्दीबळ, रॉक क्लायबिंग, ॲबॅकस अशा विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आलेली असून सुर्यमालेची आकर्षक प्रतिकृतीही ग्रहांच्या वैशिष्ट्यांसह साकारण्यात आलेली आहे. याव्दारे सुर्यापासून ग्रहांचे अंतर, त्यांच्या फिरण्याची गती, त्यामुळे होणारी दिवस - रात्र अशा विविध वैज्ञानिक बाबींची माहिती मुलांना हसत खेळत घेता येणार आहे. या झोनमधील प्रत्येक साहित्य व खेळ हा मुलांना विज्ञानाची माहिती देणारा व शास्त्राची गोडी वाढविणारा आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai