खारघर-तुर्भे टनेलसाठी 3166 कोटी मंजूर
- by Aajchi Navi Mumbai
- Sep 30, 2023
- 409
काम चार वर्षात पूर्ण होणार ; खर्चास सिडको संचालक मंडळाची मान्यता
नवी मुंबई : खारघर येथे निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्क (आयसीपी) ला थेट जोडण्यासाठी खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) ची उभारणी सिडकोद्वारा करण्यात येत आहे. सिडको या प्रकल्पावर आकस्मिक खर्चासह तब्बल 3166 कोटी 78 लाख रुपये खर्च करणार असून केटीएलआर प्रकल्प आगामी चार वर्षात पुर्ण केला जाणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी दिली. या मार्गामुळे वाशी ते खारघर दरम्यान पोहचण्यास लागणाऱ्या वेळेत किमान 15 मिनिटांची बचत तर होणार आहेच शिवाय या दरम्यान होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका देखील होणार असल्याचे ते म्हणाले.
सायन-पनवेल महामार्गावर वाशी ते खारघर दरम्यान सातत्याने निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी निर्माण करण्यात येणाऱ्या खारघर-तुर्भे टनेल रोडच्या (केटीएलआर) निर्मितीकरिता होणाऱ्या खर्चास सिडको संचालक मंडळाने नुकतीच सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. तसेच केटीएलआर प्रकल्प उभारणीचे काम मे. रित्वीक-एव्हरास्कॉन (जेव्ही) या संयुक्त भागीदारीत असलेल्या लघुत्तम निविदाधारकाला देण्यावर संचालक मंडळाने शिक्कामोर्तब केले आहे. खारघर येथे निर्माण होत असलेल्या इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्क (आयसीपी) ला थेट जोडण्यासाठी सायन-पनवेल महामार्गावर तुर्भे येथून पारसिक हिलचा डोंगर पोखरुन हा रस्ता टनेल व व्हाया-डक्टच्या माध्यमातून थेट इंटरनॅशनल कॉरपोरेट पार्कला जोडला जाणार आहे. केटीएलआर रोडची एकूण लांबी 5.49 कि.मी. असून या मार्गाच्या दोन्ही दिशेला 4-4 मार्गिका असणार आहेत. हा मार्ग संपुर्णत: उन्नत असून या मार्गावर उभारण्यात येणाऱ्या व्हाया-डक्टची लांबी 3.4 कि.मी. आहे. तर पारसिक हिलचा डोंगर पोखरून 1.8 कि.मी. लांबीचा बोगदा (टनेल) या मार्गात उभारला जाणार आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने खारघर-तुर्भे टनेल रोड (केटीएलआर) उभारण्यासाठी नगरविकास विभागाने 24 जानेवारी 2023 रोजी सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली आहे. तुर्भे येथे होणाऱ्या वाहतुककोंडीचा ताण कमी करण्यासाठी तुर्भे ते खारघर हा नियोजित भुयारी मार्ग लवकरात-लवकर सुरु करण्याची मागणी आमदार गणेश नाईक यांनी शासन स्तरावर लावून धरली होती. हा भुयारी मार्ग तयार झाल्यावर तुर्भे येथे वाहतूक कोंडी न होता सदर वाहतूक थेट खारघर येथे बाहेर पडेल. परिणामी सायन-पनवेल मार्गावरील वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai