हॉटेलमुळे निवासी इमारतींची सुरक्षा धोक्यात
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 17, 2024
- 238
नियम धाब्यावर बसवून व्यवसाय
पनवेल : पुर्वी झालेल्या आग दुर्घटनेतून कोणताही बोध न घेता नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या खारघर येथील हायवे ब्रेक हॉटेलला रविवारी मध्यरात्री पुन्हा आग लागली. या सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जिवतीहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. मात्र या घटनेमुळे खारघरमधील तीनशेहून अधिक हॉटेले व उपाहारगृह चालकांनी सिडकोच्या अग्निशमन यंत्रणेने सुचविलेल्या सर्व नियमांचे पालन केले आहे का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या हॉटेलमुळे निवासी इमारतींची सुरक्षाही धोक्यात आली आहे.
खारघरच्या शेकडो हॉटेल मालकांनी अद्याप या यंत्रणेकडून परवाना नूतनीकरणाची प्रक्रिया केली नसल्याचे समोर आले आहे. निवासी इमारतीमध्ये तळमजला आणि पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर चालणाऱ्या हॉटेल व उपाहारगृह चालकांमुळे संपूर्ण निवासी इमारतीला धोका होऊ शकतो असा प्रश्न उपस्थित झाला आहे. हॉटेल चालविण्यासाठी पोलीस, पनवेल पालिका, आरोग्य आणि अग्निशमन यंत्रणेच्या परवानगीची गरज असते. परंतु अद्याप खारघर नोडचे हस्तांतरण पनवेल महापालिकेकडे झाले नसल्याने हॉटेल व्यावसायिकांचे फावले आहे. खारघर उपनगर वगळता पनवेल महापालिका क्षेत्रातील इतर परिसरातील हॉटेल व उपहारगृह व्यावसायिकांना पनवेल पालिकेच्या अग्निशमन दलाकडून ना हरकत प्रमाणपत्र नूतनीकरणासाठी पालिकेवर अवलंबून राहावे लागते. सिडको मंडळाने पनवेल महापालिकेला खारघर वसाहत हस्तांतरण न केल्यामुळे खारघरचे अग्निशमन यंत्रणेकडून परवाना घेतल्यावर संबंधित हॉटेलमालकांनी हस्तांतरण झाल्यापासून परवानगीसाठी अर्ज केले नसल्याचे माहिती अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिली. खारघरमधील हॉटेलचालकांनी सिडकोच्या अग्निशमन दलाकडून काढलेल्या परवान्याचे नूतनीकरण करून घेणे अपेक्षित आहे. अग्निशमन दलाने सुचविल्याप्रमाणे यंत्रणा लावण्यासोबत ती यंत्रणा कार्यान्वित आहे का याची तपासणी वेळोवेळी करणे तेवढेच गरजेचे आहे. हॉटेलच्या जागेत हवा खेळती राहावी, आपत्तीवेळी स्वतंत्र दरवाजे असावेत यासोबत हॉटेलमधील गिऱ्हाईक व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार होणे गरजेचे आहे.
- हॉटेल हायवेे ब्रेक खाक
2019 मध्येही याच हॉटेलला आग लागली होती. मात्र, त्यातून बोध घेऊन अग्निशमन सुविधांत सुधारणा केल्याने रविवारी पुन्हा आग लागली. आगीत कोणाला दुखापत झाली नसली तरी पनेवल महापालिका क्षेत्रातील हॉटेल सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पनवेल-शीव महामार्गावर हे हॉटेल असून रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास त्याला भीषण आग लागली. तात्काळ हॉटेल खाली करण्यात आले. याची माहिती मिळताच खारघर अग्निशमन दलाच्या बंबाने दोन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. सायन-पनवेल महामार्गाला खेटूनच हे हॉटेल असल्याने कोपरा गावासह खारघरवासीयांनी घटनास्थळी गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी हॉटेल बंद झाल्याने तातडीने हॉटेलच्या व्यवस्थापनाने ते उघडून अग्निशमन दलाच्या जवानांना आत प्रवेश करण्यासाठी वाट करून दिली. मात्र तोपर्यंत आगीत संपूर्ण हॉटेल खाक झाले होते. ही आग नेमकी अशामुळे लागली याचे कारण अद्याप अग्निशमन यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना समजू शकले नसले तरी व्यवस्थापनाने अग्निशमन नियमावली पायदळी तुडविल्याने ती भडकल्याचा जाणकारांचा अंदाज आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai