शिक्षण विभागाचा कारभार ‘पहिले पाढे पंचावन्न'
- by Aajchi Navi Mumbai
- Jul 27, 2024
- 307
दिड महिन्यांनंतरही विद्यार्थी गणवेश, शैक्षणिक साहित्याविना ; उबाठा गटाकडून आंदोलन करुन शिक्षण विभागाचा निषेध
नवी मुंबई ः नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप नवी मुंबई महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने सावळागोंधळाचा अध्याय सुरू ठेवला आहे. या समस्येवर तातडीने मार्ग काढण्यासाठी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने शिक्षण विभाग उपायुक्तांच्या दालनात आंदोलन केले. घोषणाबाजी करुन या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. तसेच लवकरात लवकर साहित्य वाटप केले नाही तर स्वातंत्र्यदिनी मुख्यालयाबाहेर उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या 52 शाळांमध्ये सरासरी 50 हजार विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. नवी मुंबईतील विद्यार्थ्यांनाही दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने अत्याधुनिक शाळांच्या इमारती उभारल्या आहेत. पालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या, पुस्तके, बूट, मोजे, रेनकोट यांसारखे शालेय साहित्य, गणवेशही महापालिकेच्या वतीने देण्यात येतात. मात्र मागील काही वर्षे शैक्षणिक साहित्याच्या वाटपात अनियमितता सुरू आहे. 2023-24 च्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि गणवेश देण्याचा प्रयत्न केला. यासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली होती. ई-रुपीच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करून शालेय गणवेश आणि साहित्य देण्यात येणार होते. परंतु अनेक त्रुटींमुळे नियोजन फसले. शैक्षणिक वर्ष संपताना कसेबसे ‘डीबीटी' योजनेद्वारे केवळ 80 टक्के विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश मिळाले. त्यामुळे हे वर्षही पुस्तके वगळता शैक्षणिक साहित्याविना विद्यार्थ्यांना काढावे लागले होते.
2024-25 या शैक्षणिक वर्षात शाळा चालू होताच दोन आठवड्यांत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्य देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे शिक्षण विभागाकडून त्यावेळी सांगितले होते. त्यामुळे या वर्षी शाळा सुरू होतानाच, शैक्षणिक साहित्य मुलांच्या हाती पडण्याची अपेक्षा सर्वांना होती. मात्र प्रत्यक्षात 2024-25या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला तरी अजूनही विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्य मिळालेले नाही. परिणामी, विद्यार्थ्यांना बाहेरून पैसे खर्च करून शैक्षणिक साहित्य विकत घ्यावे लागत आहे. मोलमजुरी करणाऱ्या पालकांना पालिका शाळांचा मोठा आधार वाटत असताना पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे त्यांना पदरमोड करुन साहित्य विकत घ्यावे लागत असल्याने त्यांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे. दरवर्षी चाललेल्या या ढिम्म कारभारामुळे पहिले पाढे पंचावन्न अशी अवस्था शिक्षण विभागाची झाल्याची चर्चा नवी मुंबईत सुरु आहे.
यावर्षी लोकसभा आणि त्यानंतर शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक झाली. या निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे कामे करता आली नाहीत, असे पालिकेतर्फे सांगितले जात आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात होणाऱ्या अक्षम्य दिरंगाईवर तातडीने मार्ग का काढावा यासाठी शिवसेना उबाठा गटाच्यावतीने शिक्षण विभाग उपायुक्तांच्या दालनात बुधवारी आंदोलन केले. येत्या काही दिवसात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप न झाल्यास स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पालिका मुख्यालयाबाहेर उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे. घोषणाबाजी करुन या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. यावेळी उपशहरप्रमुख समीर बागवान, महेश कोठिवले, संदीप पवार व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai