टाकाऊ वस्त्रांपासून करणार वस्तूंची पुनर्निर्मिती
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 22, 2025
- 458
जुने कपडे संकलनासाठी सोसायट्यांमध्ये स्वतंत्र पेट्यांचा वापर
नवी मुंबई ः सध्या बदलत्या फॅशन ट्रेंडमुळे कपडे वापरण्याचा कालावधी कमी झाला असून त्यामुळे कपडे टाकून देण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यावर ठोस उपाय योजना करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अखत्यारितील वस्त्र समितीच्या वतीने पुढाकार घेण्यात येऊन टाकाऊ वस्त्रावर प्रक्रिया करुन त्याचा पुनर्वापर करण्याचा नाविन्यपूर्ण प्रकल्प नवी मुंबईत राबविण्यात येत आहे. यासाठी जुने कपडे संकलन करण्यासाठी सोसायट्यांमध्ये स्वतंत्र पेट्या ठेवण्यात येत आहेत. या कपड्यांवर प्रक्रिया करुन वस्तुंची पुनर्निमित करण्यात येणार आहे. ज्यामुळे महिलांना, स्थानिक कारागिरांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
केंद्र सरकारच्या वस्त्र मंत्रालय अंतर्गत टेक्सटाईल कमिटी, नवी मुंबई महापालिका यांच्या माध्यमातून हा अभिनव प्रकल्प देशात पहिल्यांदाच नवी मुंबईत राबविण्यात येत असून यामध्ये एसबीआय फाऊंडेशन लि.,आयडीएच इंडिया हब प्रा.लि., टिसर आर्टिसन ट्रस्ट या संस्थांचा सहयोग असणार आहे. या 5 संस्थांमध्ये या बाबतचा सामंजस्य करार करण्यात आला असून या प्रकल्पाचे उद्घाटन 11 ऑक्टोबर 2024 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले आहे. कापड मूल्य साखळीतील शाश्वतता आणि परिपूर्णता लक्षात घेत वापरानंतरच्या वस्त्रांचे सुयोग्य व्यवस्थापन करणारा हा प्रकल्प टाकून दिलेल्या कपड्याचे मूल्यवान उत्पादनामध्ये रुपांतर करणार असून याव्दारे स्थानिक कारागीरांना शाश्वत रोजगार उपलब्ध होणार आहे. यामध्ये विशेषत्वाने महिलांचे सबलीकरण होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पांतर्गत टाकाऊ वस्त्रांचे संकलन करण्याकरिता पहिल्या टप्यात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 250 सोसायट्यांमध्ये जुने कपडे संकलन करण्याकरिता पेट्या ठेवण्यात येणार असून महापालिकेच्या पुढाकाराने एस.बी.आय. फाउंडेशन लि. यांच्या मदतीने व टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत एकुण 47 सोसायट्यांमध्ये स्वतंत्र 49 पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. उर्वरित पेट्या टप्प्याटप्प्याने इतर सोसायट्यांमध्ये ठेवण्यात येणार आहेत. टाकाऊ वस्त्राचे संकलन करणेकरिता स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून शहरात विविध ठिकाणी असलेले थ्री आर सेंटर्स व 47 सोसायट्यांमधून टाकाऊ वस्त्र संकलीत करण्यात येणार आहेत. बेलापूर येथील शकुंतला महाजन बहुउद्देशीय इमारत, से.2, सीबीडी बेलापूर या ठिकाणी संकलित वस्त्रावर पुढील प्रक्रिया करण्याकरिता टाकाऊ वस्त्र प्रक्रिया केंद्र उभारण्यात आले आहे.
टिसर आर्टिसन ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने सदर चांगल्या स्वरुपातील टाकाऊ वस्त्रांचे विलगीकरण करून हॅन्डलूमच्या सहाय्याने अप- सायकलींग करण्यात येणार आहे. या प्रक्रियेत टाकाऊ कपड्यापासून विविध प्रकारच्या वस्तूंची पुनर्निर्मिती करण्यात येणार आहे. तयार करण्यात आलेल्या वस्तूंचे बाजारपेठेत प्रदर्शन करण्यात येणार असून त्यांची विक्रीही करण्यात येणार आहे. यामध्ये महिला स्वयंसहाय्यता बचतगटांची मदत घेतली जाणार आहे. हा प्रकल्प राबविल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातून घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी जाणाऱ्या कचऱ्याचा भार काही अंशी कमी होणार असून कचरा कमी करण्याप्रमाणेच महिलांना रोजगारही उपलब्ध होणार आहे.
- कोणते कपडे जमा कराल
पँट, शर्ट, जॅकेट, मोजे, पायजमे, स्कर्ट, ड्रेस, शॉर्टस, ब्लाउुज, पुरुषांचे शर्ट तसेच लहान मुलांचे कपडे त्याचप्रमाणे चादरी, स्वच्छतेसाठी वापरण्याचे टॉवेल सारखे कपडे, ब्लँकेट, बेड स्प्रेड्स, रजई, कंफर्टर, पडदे अशी वस्त्र सामग्री द्यावी. तथापि अस्वच्छ किंवा दूषित कपडे व वस्त्र सामग्री, वैद्यकिय वापराचे कपडे, सॅनेटरी पॅड, गाद्या, लेदर पर्स, पादत्राणे, बेल्ट, औद्योगिक कापड, अंतर्वस्त्रे देऊ नयेत असेही सूचित करण्यात येत आहे.
वापरानंतरच्या वस्त्रांचे व्यवस्थापनाचा अभिनव प्रकल्प राबविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेची देशातून निवड करण्यात आली ही सर्वच नागरिकांसाठी अभिमानाची गोष्ट असून नेहमीच नावीन्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यात आघाडीवर असणारी आपली महापालिका हा उपक्रमही यशस्वी करेल. आपल्या घरातील चांगल्या स्वरुपाचे टाकाऊ कपडे नागरिकांनी सोसायटीमध्ये दिलेल्या स्वतंत्र पेट्यांमध्ये जमा करावेत अथवा आपल्या जवळच्या थ्री आर सेंटरमध्ये ठेवावेत आणि हा अभिनव प्रकल्प यशस्वी करण्यासाठी संपूर्ण योगदान द्यावे. - आयुक्त डॉ. कैलास शिंदे
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai