एप्रिलपासून जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 29, 2025
- 312
454 कर थकबाकीदारांना नोटीस बजावणी
नवी मुंबई ः महापालिकेच्या मालमत्ताकर विभागाने कर थकबाकी असलेल्या जप्त मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील एकूण 8 वॉर्डमधील 454 जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने जप्तीची कारवाई प्रस्तावित असलेल्या मालमत्ताधारकांनी आपला थकीत मालमत्ताकर त्वरित भरावा असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे. अन्यथा जप्त मालमत्तांवर एप्रिल 2025 पासून लिलाव कारवाई करण्यात येईल असेही सूचित करण्यात आले आहे.
महापालिकेच्या अखत्यारित असणाऱ्या विविध मालमत्तांवर कर आकारणी व कर संकलन विभाग यांच्यामार्फत मालमत्ता कर आकारणी व वसूलीची कार्यवाही करण्यात येते. मालमत्ता कर आकारणी पुस्तकात नोंद असलेल्या मालमत्तांच्या करांची देयके (बिल) ही महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण 8 नियम 39 नुसार तयार करण्यात येतात. विहित मुदतीत मालमत्ता कर देयकांची रक्कम न भरलेल्या मालमत्तेवर कलम 128 व प्रकरण 8, नियम 42 ते 48 मधील तरतुदीनुसार जप्ती कारवाई करण्यात येते. या जप्त मालमत्तांवर लिलावाद्वारे विक्री कार्यवाहीची तरतूददेखील नियमानुसार करण्यात आलेली आहे. थकीत मालमत्ताकराच्या वसूलीसाठी जप्त केलेल्या मालमत्तांची लिलावाद्वारे विक्री करणे व त्यासाठी मालमत्तेचे मूल्यांकन करणे गरजेचे आहे परिणामी जप्त केलेल्या मालमत्तांच्या लिलाव मूल्यांकनासाठी अधिकृत शासकीय मूल्यकारांची (गर्व्हनमेंट व्हॅल्युअर्स) नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कर थकबाकीदारांना करभरणा करताना आर्थिक दडपण न येण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने 10 मार्च 2025 पासून अभय योजना’ सुरू केली आहे. थकीत कराच्या विलंब शुल्कावर 50 टक्के सूट देणाऱ्या अभय योजनेचा 31 मार्च 2025 पर्यंत लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी (शनिवार-रविवार) नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय व इतर विभागीय कार्यालयांमध्ये कर भरणा केंद्र (कॅश काऊंटर्स) सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 या वेळेत सुरू राहतील याची नोंद घ्यावी असेही महापालिकेमार्फत सूचित करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai