15 मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करा
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 26, 2025
- 272
पालिका आयुक्तांचे सर्व प्राधिकरणांना निर्देश
नवी मुंबई ः पालिका क्षेत्रात सध्या सुरू असलेली रस्ते, गटारे, पदपथ, मलनि:स्सारण वाहिन्या, कल्व्हर्ट यांची कामे 15 मे पर्यंत पूर्ण करावीत असे पालिका आयुक्तांनी सर्व प्राधिकरणांच्या अधिकारी वर्गाला दिले. त्याचबरोबर सर्व प्राधिकरणांनी परस्पर समन्वय राखून पावसाळी कालावधीत कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही याची काळजी घेण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी करावी असे स्पष्ट केले.
नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शहर आपत्ती व्यवस्थापन समितीची नियोजन बैठक पार पडली. यावेळी विविध प्राधिकरणांचे अभियंता, अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आयुक्तांनी आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने त्याआधी करावयाचा अत्यावश्यक कामांचा बाबनिहाय सविस्तर आढावा घेतला व याविषयीची कार्यवाही तातडीने करावी असे निर्देशित केले. यामध्ये विशेषत्वाने पावसाळ्याआधी करण्यात येणारी नालेसफाई व मोठ्या गटारांची सफाई तत्परतेने सुरू करावी व नियोजित वेळेत पूर्ण करावी असे निर्देश त्यांनी दिले.पावसाळी कालावधीपूव धोकादायक झाडे व झाडांच्या फांदयांची गरजेएवढी छाटणी करण्याबाबत कार्यवाही सुरु करावी. पालिकेसह सिडको, रेल्वे, पीडब्ल्यूडी व इतर प्राधिकरणांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे व अनधिकृत होर्डींग हटविण्याची कार्यवाही करावी असे स्पष्ट निर्देश यावेळी देण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे शहरातील मुख्य व मध्यवत सायन पनवेल महामार्ग असल्याने तो खड्डेमुक्त व सुस्थितीत रहावा या दृष्टीने संपूर्ण काळजी घ्यावी तसेच वाहतूक पोलीसांच्या सहयोगाने वाहतूकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. अशाच प्रकारे एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या काटई रस्त्याच्या कामांमुळे सेक्टर 3 ऐरोली येथील नाल्याच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही यासाठी आवश्यक दक्षता घेणेबाबत तसेच काही ठिकाणी खराब झालेला रस्त्यांची पावसाळापूर्व तातडीने दुरूस्ती करावी असेही निर्देश देण्यात आले.
महाराष्ट्र विद्युत पारेषण कंपनीची दरवाजे तुटलेली सबस्टेशन, डीपी बॉक्स, उघडया केबल यांची दुरुस्ती तत्परतेने करण्याचे सूचित करतानाच आयुक्तांनी मोठया ट्रान्सफॉर्मरच्या आसपास असणारी अस्वच्छता दूर करण्याकडे विशेष लक्ष देण्याचे सूचित केले. महानगर गॅस लिमीटेडनेही आवश्यक ती खबरदारी घेऊन पावसाळी कालावधीत विशेष खबरदारी घ्यावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. सिडको व रेल्वे प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने रेल्वे स्टेशन्समधील आवश्यक कामे पूर्ण करावीत. एपीएमसी मार्केट अंतर्गत स्वच्छतेबाबत संबंधित प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
सर्व प्राधिकरणांनी आपले नियंत्रण कक्ष सुरू करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश देण्यात आले. आठही विभाग कार्यालय स्तरावर आपत्तीकाळात नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यासाठी जागा निश्चित करण्याची कार्यवाही करावी व त्याठिकाणी अन्नपदार्थांसह गरजेच्या वस्तू उपलब्ध राहतील याचे आत्तापासूनच नियोजन करावे असेही सूचित करण्यात आले. बैठकीत चर्चेअंती ठरलेल्या बाबींची अंलबजावणी संबंधित प्राधिकरणांनी गांभीर्याने करावी असे सूचित करीत महापालिका आयुक्त तथा नवी मुंबई शहर आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉ. कैलास शिंदे यांनी 15 मे पर्यंत पावसाळापूर्व कामे पूर्ण करावीत असे निर्देश दिले व आपण स्वत: पहाणी करणार असल्याचे स्पष्ट केले.
- स्थलांतराबाबत आवश्यक कार्यवाही
पालिकेच्या क्षेत्रात एमआयडीसी भागात मोठया प्रमाणावर रस्ते व इतर कामे सुरु असून ती कामे जलद पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच दरड कोसळण्याच्या संभाव्य जागांची पाहणी करुन नागरिकांचे वास्तव्य असल्यास त्यांचे तत्परतेने स्थलांतरण करावे असे आयुक्तांनी सूचित केले. विशेषत्वाने दिघा इलठणपाडा धरणाच्या खाली असणाऱ्या झोपड्यांच्या स्थलांतरणविषयक आवश्यक कार्यवाही करावी तसेच नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपडपट्टया स्थलांतरणाबाबतही कार्यवाही करण्याचे आयुक्तांनी सूचित केले. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांच्या स्थलांतराबाबत आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे आयुक्तांमार्फत सूचित करण्यात आले. यामध्ये विशेषत्वाने गावठाण भागातील इमारतींच्या स्थितीचीही पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. - बैठकीला उपस्थित प्राधिकरणे
बैठकीला पालिकेचे सर्व वरिष्ठ अधिकारी, पीडब्ल्यूडी, सिडको, एमआयडीसी, एमएमआरडीए, पीडब्ल्यूडी, नवी मुंबई पोलीस व वाहतुक पोलीस, औद्योगिक सुरक्षा विभाग, एपीएमसी, एमपीसीबी, रेल्वे, बेस्ट, महावितरण व महापारेषण, एपीएमसी, आरएएफ, नागरी संरक्षण दल, होमगार्ड, महानगर गॅस लिमी., टीबीआयए, स्मॉल स्केल इंड.असो., एमटीएनएल, एअरटेल-रिलायन्स मोबाईल सेवा, मच्छीमार संघटना आदी विविध प्राधिकरण, संस्था यांचे अधिकारी उपस्थित होते.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai