माझी वसुंधरा अभियान 5.0’ मध्ये नवी मुंबई पालिका राज्यात व्दितीय
- by Aajchi Navi Mumbai
- Feb 20, 2026
- 29
नवी मुंबई ः शासनाच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेस 10 लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अमृत शहरांच्या गटात ‘राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचे मानांकन’ प्राप्त झाले आहे. नवी मुंबई महापालिकेच्या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीत हा आणखी एक बहुमान लाभल्याबद्दल नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, उपमहापौर दशरथ भगत आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आनंद व्यक्त करीत सर्व नवी मुंबईकर नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित ‘माझी वसुंधरा अभियान 5.0’ हे दि. 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले. यामध्ये राज्यातील 422 नागरी स्थानिक संस्था व 27,895 ग्रामपंचायती अशा एकूण 28,317 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. यात नवी मुंबई महापालिकेने पंचतत्वांपैकी प्रत्येक तत्वाशी निगडीत थिमॅटिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून राज्यातील मोठ्या शहरांमध्ये व्दितीय क्रमांकाचा बहुमान प्राप्त केलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी अभियान कालावधीत केलेल्या कामाचे डेस्कटॉप मूल्यमापन व फिल्ड मूल्यमापन त्रयस्थ यंत्रणांमार्फत करण्यात आले. या दोन्ही मूल्यमापनातील एकूण गुणांच्या आधारे माझी वसुंधरा अभियान 5.0 मधील राज्यातील सर्वोत्तम स्थानिक स्वराज्य संस्थांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने द्वितीय क्रमांक पटकावून उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली आहे.
माझी वसुंधरा अभियान 5.0 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने भूमी थिमॅटिक क्षेत्रांतर्गत भूमी संवर्धन, जैवविविधता संरक्षण आणि शाश्वत शहरी विकासाच्या दिशेने सातत्याने प्रभावी पावले उचलेली आहेत. यादृष्टीने मोठया प्रमाणात वृक्षलागवड केली व त्यामध्ये विशेषत्वाने जैवविविधतेला प्राधान्य मिळेल अशा देशी वृक्ष रोपांची लागवड करण्यात आली. या वृक्षांची जिओ टॅगिंगसह वृक्ष गणना करण्यात आली आहे. या सोबतच रोप वाटिकांची निर्मिती आणि त्यामध्ये स्थानिक वृक्ष प्रजातीचे संवर्धन करण्यावर भर देण्यात आला असून नवीन हरित क्षेत्रांचा विकास करुन शहरात किमान 33 टक्के हरित आच्छादन करण्यासाठी नियोजन बध्द कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीग या विशेष कॅटेगरीमध्ये समाविष्ट देशातील 4 व राज्यातील एकमेव शहर असणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेने कचऱ्याचे निर्मितीच्या ठिकाणी वर्गीकरण व नियोजनबध्द संकलन व्यवस्थेवर भर दिला आहे. वायू थिमॅटिक क्षेत्रांतर्गत नवी मुंबईतील हवा गुणवत्ता चांगली रहावी या करिता विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे. प्रयोगशाळांमार्फत नियमित वायू गुणवत्ता परीक्षण तसेच बांधकाम व पाडकाम कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यावर भर दिला जात आहे. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छ, प्रदूषणमुक्त व शाश्वत शहरी पर्यावरणासाठी आणि वायू गुणवत्तेच्या संतुलनासाठी प्रभावी पावले उचललेली आहेत.
जल थिमेटिक क्षेत्रांतर्गत जल संसाधनांचे संवर्धन व पुनरुज्जीवन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानांतर्गत जलसंपत्तीचे संरक्षण, पुनर्भरण व शाश्वत वापर यासाठी वैज्ञानिक, नियोजनबद्ध व दीर्घकालीन दृष्टीकोनातून कामे करण्यात येत आहेत. अग्नी थिमॅटिक क्षेत्रांतर्गत नूतनीकरणीय ऊर्जा स्रोतांचा वापर करणे व ‘निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन’ संकल्पनेबाबत व्यापक जनजागृती व प्रसार केला जात आहे. हरित इमारती संकल्पनेनुसार इमारतींची उभारणी करण्यास विशेष प्रोत्साहन दिले जात आहे. आकाश थिमॅटिक क्षेत्रांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेने विविध प्रचार व प्रसार माध्यमांचा प्रभावी वापर केला असून ई-प्लेज नोंदणी व उद्दिष्टपूर्तीची सक्रिय अंमलबजावणी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai