64 वर्षीय रुग्णाच्या मेंदूतून काढली 700 ग्रॅम वजनाची गाठ
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 09, 2026
- 33
फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलच्या डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया
नवी मुंबई : वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथील सल्लागार न्यूरोसर्जन डॉ. समीर काळे आणि त्यांच्या टीमने 64 वर्षीय रुग्णाच्या मेंदूतील ‘स्फेनोइड विंग मेनिन्जिओमा’ नावाची मोठी गाठ काढून वैद्यकीय क्षेत्रात दैदीप्यमान कामगिरी केली आहे. या रुग्णाच्या मेंदूतून 700 ग्रॅम स्फेनोइड विंग मेनिन्जिओमा गाठ काढण्यात आली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे रुग्णाला मानसिक आणि शारिरीक त्रासातून मुक्तता मिळाली आणि त्यांना नवे जीवन मिळाले.
खारघर येथील 64 वर्षीय रुग्ण गणेश यादव (नाव बदललेले आहे) यांच्या मेंदूमध्ये सुमारे 700 ग्रॅम वजनाचा स्फेनॉइड विंग मेनिँजिओमाची मोठी गाठ आढळून आली होती. गाठीबद्दल अज्ञात असलेल्या यादव यांना दहा वर्षांपासून वागणुकीत बदल, चिडचिड, विस्मरण, डोकेदुखी आणि मेंदूशी संबंधित त्रास होत होता. गेल्या दहा वर्षांपासून यादव दैनंदिन जीवनातील असंख्य अडचणींचा सामना करत होते. यादव यांना रोजच्या कामासाठी ते इतरांवर अवलंबून राहू लागले. मानसिक तणावामुळे यादव यांना त्रास होत असल्याचे ग्राह्य धरले गेल्याने त्यांच्यावर मानसिक उपचार केले गेले. परिणामी, मूळ आजाराचे निदान होण्यास दिरंगाई झाल्याने ते योग्य उपचारांपासून दूरापास्त राहिले. अखेरिस गणेश यादव यांनी नोव्हेंबर 2025 रोजी नवी मुंबईतील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल गाठले. डॉक्टरांनी यादव यांच्यावर आवश्यक सर्व वैद्यकीय तपासण्या केल्या. यादव यांच्या मेंदूच्या उजवीकडील पुढच्या भागात मोठी गाठ असल्याचे निष्पन्न झाले. ही गाठ मेंदूच्या इतर भागांवर मोठा दबाव निर्माण करत होती. मेंदू आपल्या मूळ जागेपासून 8.3 मिमी अंतरावर सरकला होता. वैद्यकीय भाषेत मेंदूतील या गाठीला स्फिनॉइड विंग मेनिन्जिओमा असे संबोधले जाते. मेंदूतील गाठ वाढत असल्याकारणाने डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. 19 नोव्हेंबर रोजी डॉ. काळे यांनी रुग्णावर बायफ्रंटल क्रॅनियोचटॉमी ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन रुग्णाच्या मेंदूतील सुमारे 700 ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीरित्या बाहेर काढली. गाठीचा आकार मोठा असल्याने, मेंदूत इतर ठिकाणी गाठ तयार झाल्याने ही शस्त्रक्रिया आव्हानात्मक मानली जात होती. अनुभवी डॉक्टरांच्या टीममुळे या शस्त्रक्रियेदरम्यान कोणताही गुंतागुंत निर्माण झाली नाही. शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. गाठीचा आकार आणि स्थान लक्षात घेता रुग्णाच्या हाता-पायांमध्ये अशक्तपणा येण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला कोणताही अशक्तपणा जाणवला नाही. त्याच्या शारिरीक हालचालींवरही दुष्परिणाम झाला नाही. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी रुग्णाला अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. 24 तासानंतर त्याचा व्हेंटिलेटर सपोर्ट काढण्यात आला. रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा दिसून आली. रक्तदाब, हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी हे सर्व आरोग्याचे निकष सामान्य पातळीवर नोंदवले गेले. या काळात रुग्ण शुद्धीवर आल्याने जागरुक होता. रुग्ण डॉक्टरांच्या सूचनांनाही योग्य प्रतिसाद देत होता. रुग्णाकडून मिळणारा प्रतिसाद पाहता मेंदूच्या कार्यात कोणताही बिघाड झाला नसल्याने डॉक्टरांना दिलासा मिळाला. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची चिडचिड पूर्णपणे थांबली. वागणूकीतही समाधानकारक बदल दिसून आले. या बदलांमुळे रुग्ण आपले दैनंदिन आयुष्य पूर्वीप्रमाणे जगू शकला. त्याचे परावलंबित्वही कमी झाले. आपल्या वडिलांवर यशस्वी उपचार केल्याने रुग्णाच्या मुलाने डॉक्टरांसह संपूर्ण टीमचे आभार मानले.
700 ग्रॅम वजनाइतका मोठा मेनिन्जिओमा यशस्वीरीत्या काढणे हे आमच्या सर्जिकल टीमचे कौशल्य आणि अचूकता दर्शवते. अशा केसेसमध्ये गाठीची लक्षणे ही मानसिक आरोग्याशी संबंधित असतात. त्यामुळे या आजाराचे वेळेवर अचूक निदान होणे महत्त्वाचे असते. शस्त्रक्रियेनंतर या रुग्णाच्या वर्तणूकीत आणि मानसिक आरोग्याशी संबंधित इतर बाबतीत सुधारणा दिसून आली. ही उल्लेखनीय आणि दुर्मिळ बाब समजली जाते. रुग्णाने वेळेवर प्रभावी उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होणे शक्य होते, हे या केसमधून स्पष्ट होते. - डॉ. समीर काळे, फोटिस हिरानंदानी हॉस्पिटलचे सल्लागार न्यूरोसर्जन
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai