ग्रामीण महिलांची ‘उमेद’ नवी मुंबईत ‘सरस’
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 26, 2026
- 39
‘महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शन 2026’ चे उत्साहात उद्घाटन
नवी मुंबई : ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या जिद्दीला, कौशल्याला आणि पारंपरिक कलेला हक्काचे व्यासपीठ देणारे महालक्ष्मी सरस विक्री व प्रदर्शना उद्घाटन सोहळा मंगळवारी वाशीत मोठ्या थाटात पार पडला. हे प्रदर्शन 4 एप्रिल पर्यंत वाशी एक्झीबीशन सेंटर येथे सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत विनामुल्य प्रवेश सुरु राहणार आहे. ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी तयार तयार केलेल्या उत्पादनांच्या या बाजारपेठेला मुंबई व नवी मुंबईतकरांनी भरभरुन दाद द्यावी असे आवाहन आयोजकांसह नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केले. ग्रामीण महिलांना शहरातील बाजारपेठेत मिळणारी व्यवसायाची ‘उमेद’ नवी मुंबईत ‘सरस’ ठरत असल्याचे चित्र या प्रदर्शनाला मिळणाऱ्या प्रतिसादावरुन दिसते.
नवी मुंबईतील वाशी एक्झीबीशन सेंटर येथे मंगळवारी“महालक्ष्मी सरस प्रदर्शन-2026” च्या उद्घाटन जल्लोषात पार पडले. यावेळी नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता सुरज पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सलुजा सुतार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर, ग्रामविकास मंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी दादासाहेब कांबळे, विशेष कार्य अधिकारी नारायण गोरे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य परिचालन अधिकारी निखिल कुमार ओसवाल, उपसंचालक राज्य ग्रामीण (सामान्य) श्वेता पालवे, अवर सचिव धनवंत माळी, महाराष्ट्राच्या विविध ठिकाणांहून आलेल्या बचत गटांच्या महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाव्दारे 24 मार्च ते 04 एप्रिल 2026 या कालावधीत ग्रामीण भागातून आलेल्या बचतगटांच्यावतीने तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी साधन सामग्रीच्या विक्रीचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासन राबवत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना शहरी बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.ंअशा प्रदर्शनांमुळे महिलांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येते, असेही त्यांनी नमूद केले.
नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी ‘महालक्ष्मी सरस 2026’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत असल्याचे नमूद केले. या विक्री व प्रदर्शनातून महिलांच्या सक्षमीकरणाला नवी दिशा मिळत असून, महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंब, समाज आणि देश अधिक बळकट होतो, असा ठाम विश्वास महापौरांनी व्यक्त केला. नवी मुंबईकरांनी प्रदर्शनाला भेट देऊन महिला उद्योजिकांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महापौर श्रीमती पाटील यांनी केले.
उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी ‘महालक्ष्मी सरस 2026’च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला मोठी चालना मिळत असल्याचे सांगितले. 2011 पासून सुरू झालेल्या उमेद अभियानाने आज लाखो महिलांना बचत गटांद्वारे स्वावलंबी बनवले असून राज्यातील कोट्यवधी कुटुंबांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी नमूद केले. ‘लखपती दीदी’ उपक्रमातून महिलांचे उत्पन्न वाढवण्यावर भर देत मोठ्या प्रमाणावर महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ‘उमेद मार्ट’व ‘उमेद मॉल’सारख्या उपक्रमांमुळे महिलांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांनी उत्पादनाची गुणवत्ता टिकवून डिजिटल माध्यमांचा वापर करून स्वतःची बाजारपेठ निर्माण करावी, असे आवाहन सागर यांनी केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीरा गुजर यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेदचे मुख्य परिचलन अधिकारी निखिलकुमार ओसवाल यांनी केले.
490 हून अधिक स्टॉल्स असलेल्या या प्रदर्शनात महिला बचत गटांच्या ग्रामीण कलाकुसर आणि अस्सल गावरान पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली मिळणार आहे. 70 स्टॉल्स हे खाद्यपदार्थांचे असून महाराष्ट्रासह इतर राज्यातीलह खाद्यपदार्थांचा येथे आस्वाद घेता येणार आहे. विविध हातमाग वस्तू, शोभेच्या वस्तू, खादीचे कपडे, कोल्हापुरी चप्पला, दागिने, पेटिंग्स, लोणची, पापड, सुकामेवा, सरबते, ताजी भाजी, अशा असंख्य गोष्टी येथे पाहता व खरेदी करता येणार आहेत. डिजीटल वॉल हे प्रदर्शनाचे आकर्षण आहे. संपुर्ण प्रदर्शन वातानुकूलीत असून सर्वांना प्रवेश विमामुल्य असणार आहे.
- ‘लखपती दीदी’ संकल्पना वेगाने साकार
महाराष्ट्रातील ‘उमेद’ अभियानाने राज्यातील 34 जिल्हे आणि 351 तालुक्यांमध्ये विस्तार करत 6 लाख 67 हजार 051 स्वयं सहायता समूह, 34 हजर 552 ग्रामसंघ आणि 1 हजार 965 प्रभाग संघ उभारले असल्याची माहिती दिली. या माध्यमातून 65 लाख 44 हजार 094 महिलांसह जवळपास 60 लाख कुटुंब सहभागी झाले असून, 13 हजार 260 उत्पादक गट आणि 364 महिला शेतकरी कंपन्यांची निर्मिती झाली आहे. उद्योग क्षेत्रात 10.94 लाख कुटुंब बिगर शेती आधारित, 39.58 लाख कुटुंब शेती आधारित तर 23.28 लाख कुटुंब पशुधन व्यवसायात सक्रिय आहेत. आर्थिक सक्षमीकरणासाठी मागील आर्थिक वर्षात 10 हजार 728 कोटी आणि सन 2025-2026 या आर्थिक वर्षात 9 हजार 244 कोटी रुपयांचे ऐतिहासिक कर्ज वितरण करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 48 हजार 178 कोटी रुपयांचा पतपुरवठा झाला आहे. या भक्कम पाठबळामुळे ‘लखपती दीदी’ संकल्पना वेगाने साकारत असून, महाराष्ट्र राष्ट्रीय स्तरावर अग्रस्थानी पोहोचला आहे.