आरक्षणाचा लढा आणखीन तीव्र होणार
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 26
उरण ः लेवे गुजर समाज व कराडी समाजच्या वतीने महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची कार्यकारिणीची राज्यव्यापी बैठक व पदभार सोहळा रविवार दिनांक 22 मार्च 2026 रोजी लेवे गुजर भवन, सेक्टर 27, रांजणपाडा, खारघर येथे मोठया उत्साहात संपन्न झाला. यावेळी आरक्षणाचा लढा आणखीन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील 33 ओबीसी जाती समूहाचे केंद्रीय ओबीसी सूची मध्ये समावेश करणेकरीता तसेच विविध शिष्यवृत्ती व ओबीसी संदर्भात माहितीचे आदान प्रदान करण्यासाठी सर्व विविध ओबीसी समाज संघटनांचे प्रतिनिधी यांनी एकत्र येऊन महाराष्ट्र ओबीसी कृती समितीची स्थापना सन 2024 मध्ये केली आहे, आणि ओबीसी कृती समिती तर्फे संयुक्त केंद्रीय आरक्षणासाठी पाठपुरावा सुरु आहे. अंतिम मंजुरी केंद्रीय कॅबिनेट मान्यतेसाठी प्रलंबित असून लवकरच निर्णयाच्या प्रतिक्षेत आहे. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अध्यक्ष श्रावण फरकाडे यांनी सांगितले कि आरक्षण हा आमचा हक्क आहे. तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत मिळणारच. त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी चालेल आमचा हक्क आम्ही मिळणारच. ओबीसी समाजातील विविध जाती उपजाती यांना केंद्रात आरक्षण मिळावे यासाठी रात्रं दिवस ओबीसी महाराष्ट्र कृती समितीचे प्रयत्न सुरु आहे. लवकरच कृती समितीच्या लढ्याला यश प्राप्त होणार आहे. राज्यात आरक्षण आहे परंतु केंद्रात आरक्षण नसल्याने ओबीसी समाजातील अनेक जाती, पोट जातींचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे. समाजाच्या न्याय हक्कासाठी व मागण्या पूर्ण करण्याच्या अनुषंगाने दिल्लीत लवकरच आंदोलन करण्याचा मानस आहे असे श्रावण फरकाडे यांनी सांगितले.
संरक्षक मंडळ सदस्य जी एम पाटील यांनीही आपल्या मनोगतात मार्गदर्शन करून कृती संघटनेच्या पाठीशी सर्वांनी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. नामदेव राऊत यांनी कृती समितीच्या माध्यमातून कशा प्रकारे आरक्षण साठी पत्रव्यवहार केला, पाठपुरावा केला याची माहिती दिली. यापुढे हा लढा आणखीन तीव्र करण्याचा विचार त्यांनी बोलून दाखविला. कार्याध्यक्ष राम खरपुरिया यांनी सांगितले कि कृती समितीच्या माध्यमातून आरक्षणच्या न्याय हक्कासाठी एकत्र आलो असून सरकारला विचार करायला भाग पाडले आहे. लढल्याशिवाय आणि मागितल्या शिवाय काही मिळत नाही. सतत पाठपुरावा सुरु ठेवल्याने केंद्र सरकारने लढ्याची दाखल घेतली असून आरक्षणचे काम 99% मार्गी लागलेले आहे. लवकरच आपल्याला यश मिळणार आहे. तरी सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून काम करावे. आरक्षणचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी लवकरच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. न्याय मिळत नसेल तर दिल्लीमध्ये आंदोलन सुद्धा करण्यात येईल असे राम खरपुरिया यांनी सांगितले.
आरक्षणाचा विषय सध्या केंद्र शासनाकडे प्रलंबित आहे. कॅबिनेट मंत्रिमंडळची मंजुरी व राष्ट्रपतीची मंजुरी प्रलंबित आहे. लवकरच हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृती समितीचे प्रयत्न सुरु आहेत. या नंतर संपूर्ण राज्यातून आलेल्या विविध जाती उपजातीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना परिचय करून दिला. परिचय कार्यक्रमानंतर पदग्रहण सोहळा संपन्न झाला. यात अनेक मान्यवरांना प्रमाणपत्रे देऊन त्यांच्यावर नवीन जबाबदारी सोपविण्यात आली. दुपारच्या सत्रात विविध ठराव मांडण्यात आले. या ठरावाला सर्वांनी एकमताने हात वर करून जाहीर पाठिंबा दिला.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai