सुसाटप्रवासासाठी उड्डाणांसह भुयारी मार्ग
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 33
रबाळे, पावणे, तुर्भे येथे उड्डाणपूल तर पामबीचवर भूयारी मार्ग प्रस्तावित
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवास सिग्नल-मुक्त करण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या रस्ते प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत, सदर मार्गावरील रबाळे, पावणे आणि तुर्भे या ठिकाणी उड्डाणपूल उभारले जातील. याव्यतिरिक्त, पाम बीच रोडवर एन्ड ऑफ जंक्शनजवळ एक दुहेरी बोगदा स्वरूपाचा भुयारी मार्ग बांधला जाणार आहे. मात्र खर्चाची कोणतीही तरतूद नसलेल्या या प्रस्तावाला सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली.
शहरातील विकासामुळे वाढत जाणारी लोकसंख्या, प्रवाशांची संख्या पाहता वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. भविष्यातील नियोजन म्हणून रस्ते मार्गावरील प्रवास सिग्नलमुक्त होण्यासाठी ठाणे-बेलापुर मार्गावर तीन उड्डामपुल उभारणे व पामबीत मार्गावर एक दुहेरी भुयारी मार्ग बांधण्याचा प्रस्ताव सभागृहनेते सागर नाईक यांनी सर्वसाधारण सभेत मांडला होता. यामध्ये भूयारी प्रकल्पाच्या 30:70 सुत्रानुसार खर्चाचे वाटप व पूल बांधकामासाठी तांत्रिक सल्लागाराच्या नियुक्तीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. या विषयांवर चर्चा झाल्यानंतर, महापौर सुजाता पाटील यांनी या प्रस्तावांना मंजुरी दिली. भविष्यातील वाहतुकीचे नियोजन प्रभावीपणे करण्यासाठी उड्डाणपूल आणि दुहेरी भुयारी मार्गांचे बांधकाम अत्यावश्यक असल्याचे सागर नाईक यांनी अधोरेखित केले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांनी या प्रस्तावाला आपला पाठिंबा दर्शविला. तथापि, या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अनेक आक्षेप नोंदवले. इतर ठिकाणी उड्डाणपुलांच्या बांधकामादरम्यान झालेला अनावश्यक खर्च आणि उधळपट्टीची उदाहरणे देत, त्यांनी असा युक्तिवाद केला की, हा प्रकल्प अशाच प्रकारच्या आर्थिक उधळपट्टीचा बळी ठरू नये. ठाणे-बेलापूर मार्गावरील उड्डाणपूल आणि भुयारी मार्गांच्या प्रस्तावाबाबत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभागृहात आक्षेप नोंदवले. शिवसेनेचे नगरसेवक द्वारकानाथ भोईर यांनी हा प्रस्ताव ज्या कार्यपद्धतीने सादर करण्यात आला होता, त्या प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी पुढे निदर्शनास आणून दिले की, तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती किंवा प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च याविषयीची कोणतीही सविस्तर माहिती सभागृहाला पुरवण्यात आली नव्हती. परिणामी, हा प्रस्ताव पुन्हा सादर करण्याची मागणी करण्यात आली आणि यावेळी प्रकल्पाच्या खर्चाचा सविस्तर तपशील त्यात समाविष्ट असावा, असे सुचवण्यात आले. तथापि, आपल्या संख्याबळाचा वापर करून सत्ताधारी पक्षाने हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. शिवाय, विजय चौगुले यांनी पारदर्शक कारभाराची मागणी केली आणि या प्रकल्पासाठीच्या कंत्राटदाराची ओळख किंवा त्यासाठी वाटप केल्या जाणाऱ्या निधीबाबत कोणतीही माहिती उघड करण्यात आली नसल्याचे नमूद केले. हा प्रकल्प हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल या आर्थिक चौकटीअंतर्गत राबवला जाईल. या मॉडेलनुसार, प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी 30 टक्के रक्कम सुरुवातीलाच अदा केली जाईल, तर उर्वरित 70 टक्के रक्कम काम पूर्ण झाल्यानंतरच्या दहा वर्षांच्या कालावधीत हप्त्यांच्या स्वरूपात परत केली जाईल. या व्यवस्थेमुळे महानगरपालिकेवर कोणताही तात्काळ आर्थिक बोजा पडणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai