नवी मुंबईत राम नवमीचा अभूतपूर्व उत्साह
- by Aajchi Navi Mumbai
- Mar 27, 2026
- 27
बेलापूरच्या यात्रेला भाविकांची गर्दी
नवी मुंबई : चैत्र शुद्ध नवमी अर्थात श्रीराम जन्मोत्सव सोहळा गुरूवारी नवी मुंबईतील बेलापूर गावात मोठा थाटामाटात संपन्न झाला. नवी मुंबई परिसरातलं ऐतिहासिक व तितकंच महत्वाचं गाव म्हणून बेलापूर गावची ख्याती आहे. ठाणे-बेलापूर पट्टीतील हे गाव खास करुन ओळखलं जात ते इथं साजऱ्या होणाऱ्या राम-मारुती जन्मोत्सवाच्या यात्रेमुळे. श्रीराम जन्मोत्सवाची परंपरा या गावानं 164 वर्षापासून आजतागायत जपली आहे.
आजच्या फेस्टिव्हलच्या जमान्यातही नितांत श्रद्धा आणि साधेपणाने साजरा होणाऱया बेलापूरच्या राम-मारुती जन्मोत्सवाने आपली मराठमोळी परंपरा जपली आहे. ठाणे, मुंबईसह नवी मुंबईत नव्याने रहायला येणाऱया नागरिकांनी या उत्सव सोहळ्याला आवर्जुन भेट दिल्याचे श्री राम मारुती जन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी सांगितले. श्रीराम जन्मोत्सवसाठी अख्खं बेलापूर गावच नव्हे तर आजुबाजुचा परिसरही सजविण्यात आला होता. गुरूवारी राम जन्म झाल्यानंतर बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर दिवाळे गाव इथल्या छाया कला सर्कलच्या ब्रास बॅण्ड पथकाने सुमधूर गीते सादर करुन श्रीराम चरणी आपली सेवा अर्पण केली. त्यानंतर बेलापूर पंचक्रोशीतील भजनी मंडळांनी दिवसभर विविध प्रकारची भजने सादर करुन रामरायापुढे आपली सांगितीक सेवा बजावली. राष्ट्रीय किर्तनकार ह.भ.प. वज्रांग चारूदत्त आफळे, पुणे यांचे श्रीराम जन्म सोहळ्याचे वर्णन गेले नऊ दिवस उपस्थित श्रोतेगणांना मंत्रमुग्ध करत आहे. श्रीराम जन्म सोहळ्याप्रसंगी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील, सभागृह नेते सागर नाईक, स्थानिक नगरसेवक अमित पाटील यांच्यासह महापालिकापदाधिकारी, अनेक नगरसेवक व नगरसेविका आदिंसह हजारो रामभक्त यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, बेलापूर पंचक्रोशीतील नागरिकांना जितकी ओढ राम जन्मोत्सवाची असते तितकीच ओढ हनुमान जयंतीची देखील असते. हनुमान जयंतीपर्यंत रोज हा किर्तन सोहळा बेलापूर गावात संपन्न होणार असून या उत्सवाची सांगता 2 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या दिवशी सायंकाळी लळीत सादरीकरणानंतर होणार आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai