खरातच्या संस्थेत महापालिका अधिकाऱ्यांची गुंतवणूक?
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 03, 2026
- 23
जमीन मिळवण्यासाठी तीनवेळा अशोक खरातची महापालिकेला भेट
नवी मुंबई ः राज्यात अशोक खरात प्रकरणाचे पडसाद जोरदारपणे उमटत असताना नवी मुंबई महापालिकेतील काही अधिकारी यापासून दूर राहिले नसल्याचे समोर आले आहे. गेल्या सहा महिन्यात अशोक खरात याने नवी मुंबई महापालिकेला तीन वेळा भेट दिल्याची चर्चा असून संबंधित अधिकाऱ्यांची आर्थिक गुंतवणुक मार्गी लावण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जाते. त्यामुळे महापालिकेतील अधिकारी आणि खरात यांचे नेमके संबंध काय याची चौकशी पालिका आयुक्तांनी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
सध्या राज्यात अशोक खरात यांच्या बुवाबाजीच्या कारनाम्यांची चर्चा जोरात सुरु आहे. खरात सोबत असलेल्या सलगीमुळे अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांची आणि महिला नेत्यांची प्रतिमा डागळली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना या प्रकरणामुळे राजीनामा द्यावा लागला आहे. अमेरिकेतील ‘एफस्टिन फाईल’ सारखे खरातचे महिलांसोबतचे व्हिडियो व अनेक राजकर्त्यांसोबत असलेली छायाचित्रे समाज माध्यमांवर प्रसिद्ध होताच राज्यातील जनतेचे लक्ष या संपुर्ण प्रकरणाकडे लागले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यातील पोलीसांना दिले असून या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याने तपासास वेळ लागत असल्याचे समोर आले आहे. दररोज नवनवीन खरातचे कारनामे समोर येत असल्याने त्याच्याशी सलगी असणाऱ्या राजकीय नेत्यांचे, बदलीसाठी खरातचा उंबरठा ओलांडणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महापालिकेतील काही अधिकाऱ्यांचे लागेबांधे खरातसोबत असल्याची चर्चा नवी मुंबईत दबक्या आवाजात आहे. खरातने गेल्या सहा महिन्यात नवी मुंबईत महापालिका मुख्यालयात तीनवेळा भेट दिल्याचीकुजबूज पालिकेत सुरु आहे. अधिकाऱ्यांची काळी कमाई खरातच्या अनेक संस्थांच्या माध्यमातून सफेद केली जात असल्याचीही चर्चा आहे. खरातच्या संस्थेला नवी मुंबईत जागा मिळावी म्हणून पालिकेतील काही अधिकारी सक्रिय असल्याचे बोलले जात असून या अधिकाऱ्यांची वरकमाई खरातच्या संस्थेत गुंतवल्याची शक्यता आहे. सदर प्रकरणी पालिका आयुक्तांनी चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांची नावे खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना द्यावीत अशी मागणी होत आहे. त्यामुळे पालिकेतील झारीतील शुक्राचार्य कोण याचा तपास आता आयुक्तांनी करणे गरजेचे आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai