बाबासाहेबांच्या विचारांतून घराघरात लोकशाही येईल
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 07, 2026
- 35
जागर व्याख्यानमालेत ॲड.वर्षा देशपांडे यांचा विश्वास
नवी मुंबई ः समानता हवेतून येणार नाही, तर बाबासाहेबांचे विचार घराघरात आणावे लागतील, मग घरामध्ये आपोआप लोकशाही येईल अशा शब्दात विचार मांडत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा देशपांडे यांनी स्त्रियांना समान मतदानाचा हक्क देण्यासह 42 हून अधिक कायदे बाबासाहेबांनी केले तो स्त्रीमुक्तीचा खरा इतिहास आहे असे मत व्यक्त केले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून ऐरोली से.15 येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकात 3 ते 13 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘जागर 2026’ व्याख्यानमालेचे शुभारंभाचे व्याख्यानपुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या ‘जागर 2026’ व्याख्यानमालेच्या शुभारंभप्रसंगी स्थायी समितीचे सभापती अशोक पाटील, नगरसेविका ऐश्वर्या सोनावणे, बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या विभागप्रमुख उपआयुक्त संघरत्ना खिल्लारे, लेट्स रिड फाऊंडेशनचे प्रमुख लेखक- उद्योजक प्रफुल्ल वानखेडे, शिक्षण मंडळ माजी सदस्य अंकुश सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.
मुंबईला जाता-येताना लांबून हे भव्यतम स्मारक नजरेस पडत होते व इथे एकदा भेट द्यायचीच अशी इच्छा मनात होती आणि आज याठिकाणी व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आले हे माझ्यासाठी स्वप्नवत असल्याची भावना ॲड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केली. स्मारक कसे असावे याचा वस्तुपाठ म्हणजे हे स्मारक असल्याचे मत मांडत सर्वत्र बंद होत चाललेली व्याख्यानाची परंपरा नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात जोपासली जात आहे याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे असे त्या म्हणाल्या. स्त्री ला शक्तीचे रूप मानले जाते पण तिला स्वत:हून पुढाकार घेऊन समान मानले जात नाही हे दुर्दैवाचे असल्याचे सांगत देवी म्हणून पुजू नका, अथवा दासी म्हणून हिणवू नका, तिला माणूस म्हणून स्विकारा हे जास्त गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. शेतीचा शोध स्त्रीने लावला कारण आदीम काळात बीजांकुरे उमलविणारी भूमी तिला तिच्यासारखी वाटली. तिच्याकडेच सृजनाची शक्ती आहे त्यामुळे तिचे महत्व जाणले पाहिजे व नुसते जाणून उपयोग नाही तर ते प्रत्यक्ष व्यवहारात मानले पाहिजे व अंगिकारले पाहिजे हे त्यांनी आवर्जून सांगितले. सुपर वूमन होण्यासाठी स्वत:चीच होणारी घुसमट आता स्त्रीने स्वत:च थांबवून आत्मपरीक्षण करावे असा सल्ला देत बाई खऱ्या अर्थाने लोकशाही जगते कारण तिला सर्वांना सहभागी करून घेणे जास्त जमते अशा शब्दात स्त्रियांचे सामर्थ्य सांगितले.
व्याख्यानाची सांगता त्यांनी, मी लिंग, जात, वर्ण भेद करणार नाही; हुंडा देणार व घेणार नाही, मुलगा मुलगी समान मानीन व लिंगनिदान चाचणी करणार नाही अशी सामुहिक शपथ उपस्थितांनी देत केली. त्यांचे सहकारी कैलास यांनी बाबा आमटे यांचे प्रेरणागीत गायले. ‘युनो पॉप्युलेशन ॲवॉर्ड’ मिळविणाऱ्या प्रियदर्शिनी इंदिरा गांधी, जे.आर.डी.टाटा यांच्यानंतरच्या ॲड. वर्षा देशपांडे या केवळ तिसऱ्या भारतीय असून त्यांच्या आंतराष्ट्रीय पुरस्कारासोबत महापौर महोदया आणि इतर मान्यवरांचे छायाचित्र काढण्यात आले.
महापौर सुजाता पाटील यांनी जागर व्याख्यानमालेचा शुभारंभ करताना बाबासाहेबांना अभिवादन करीत ते युगपुरूष होते व त्यांच्या विचारांनी युगप्रवर्तन झाले अशी भावना व्यक्त करीत अभिवादन केले. या व्याख्यानमालेतून नव्या पिढीला समानता आणि आधुनिकतेचे विचार देण्याचे संस्कार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 32 हून अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पदव्या संपादन करणाऱ्या बाबासाहेबांसमोर उच्चशिक्षित म्हणविणारे आपण ज्युनियर केजीतील विद्यार्थी आहोत अशी भावना महापौरांनी व्यक्त केली. बाबासाहेबांनी संविधानातून दिलेल्या अधिकारामुळे महापौर होण्याची संधी लाभली अशी नम्र भावना त्यांनी मांडली. महिला आत्मनिर्भर व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी लखपती दीदी योजना, एनएमएमटी बसेसमध्ये पहिल्या टप्प्यात 400 महिलांना वाहनचालक म्हणून प्रशिक्षण व रोजगार अशा विविध संकल्पना महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असल्याचे महापौरांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai