कोणाच्या ‘उत्कर्षा’साठी शिक्षक भरती
- by Aajchi Navi Mumbai
- Apr 17, 2026
- 27
दहा वर्षाच्या शिक्षक भरतीवर प्रश्नचिन्ह; 34 कोटींचा प्रस्ताव मंजुर
नवी मुंबई ः नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ व कोपरखैरणे येथे सीबीएसई शाळा सुरु आहेत. यातील कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळा क्र. 94 येथील शिक्षकभरती खाजगी संस्थेमार्फत करण्यासाठी शिक्षण विभागाने 34 कोटी रुपयांचा सादर केलेला प्रस्ताव स्थायी समितीने मंजुर केला आहे. हा खाजगी संस्थेमार्फत शिक्षक भरती करण्याचा प्रस्ताव वादात सापडला आहे. नेमका कोणाचा उत्कर्ष साधण्यासाठी हा प्रस्ताव पारित करण्यात आला असा प्रश्न नवी मुंबई करदात्यांना पडला आहे.
सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पालिकेची सत्ता लोकप्रतिनिधींकडे आल्यापासून ते दिवसरात्र नवी मुंबईकरांच्या उत्कर्षासाठी व विकासासाठी झटत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे. लागोलाग सर्वसाधारण सभा घेऊन रात्री उशिरापर्यंत कामकाज चालवून देशाला काम कसे करावे याची दिशा दाखवत आहेत. महापालिका अधिनियमातील कलमांचा चपलखीने वापर करत नवनवीन प्रस्ताव सादर करुन प्रशासनाला गोंधळून टाकत आहेत. नुकतीच स्थायी समितीने आयुक्तांनी सादर केलेल्या खाजगी संस्थेने शिक्षक भरती करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
या प्रस्तावात किती शिक्षकांची भरती होणार आहे हे नमुद नसले तरी 82 शिक्षकांची भरती सीबीएसई शाळा क्र. 94 मध्ये करण्यात येणार असून प्रतिमहा शिक्षकास 35,550 रुपये देणार असल्याचे ठरावावरुन दिसत आहे. त्याचबरोबर या शिक्षकांचा भविष्य निर्वाह निधीपोटी महापालिकेने 1 कोटी 30 लाखांची तरतूदही केली आहे. सदर ठरावात सीबीएसई शाळा क्र. 94 मध्ये किती वर्ग सीबीएसईसाठी सुरु करण्यात येणार आहेत, शाळेतील मुलांची पटसंख्या, विद्यमान शिक्षक यांचा तपशील ठरावात कुठेही नसल्याने विरोधी पक्षातील सदस्यांचा गोंधळ उडाला आहे. सूमारे 3500 पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये 82 शिक्षकांची गरज नसताना नव्याने सुरु करण्यात आलेल्या सीबीएसई शाळेला एवढ्या शिक्षकांची गरज का पडावी? हा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे. सदर प्रस्तावास पालिका आयुक्तांनी विचारपुर्वक प्रशासकीय मंजुरी दिली असल्याने प्रस्तावामागील गुढ वाढले आहे.
या निविदा प्रक्रियेत तीन निविदाकारांनी भाग घेतला होता. त्यापैकी ‘नवी मुंबई महिला उत्कर्ष मंडळ’ या संस्थेला सर्वाधिक गुण मिळाल्याने त्या संस्थेची निवड करण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. यानुसार दरवर्षी सुमारे 3 कोटी 49 लाख रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या प्रस्तावात शिक्षक पुरवठ्याची जबाबदारी सलग 10 वर्षांसाठी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पालिकेने ठोक मानधनावर शिक्षकभरती केली असती तर पालिकेला 20 ते 30 हजार रुपये प्रति शिक्षक उपलब्ध असताना पालिका आयुक्तांनी खाजगी संस्थेमार्फत शिक्षक निवडीचा 10 वर्षांचा कालावधीचा मार्ग का निवडला? हे अनुत्तरीत आहे. त्यामुळे या ठरावाची सर्वकष चौकशी होणे गरजेचे असून ही निवड नक्की कोणाच्या उत्कर्षासाठी आहे यामागील सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे.
संबंधित संस्था अनुभवी असून नियमानुसार राबविण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेतूनच तिची निवड करण्यात आली आहे. संस्थेचा पूर्वानुभव, गुणवत्ता व खर्च या सर्व बाबींचा विचार करूनच निर्णय घेण्यात आला आहे. - संघरत्ना खिल्लारे, शिक्षण उपायुक्त, नवी मुंबई महानगरपालिका
- अंमलबजावणी तुर्त थांबवा
सदर प्रकरणी पालिका आयुक्तांनी शिक्षण मंडळाकडून खुलासा मागवावा आणि सदर प्रस्तावाबाबत इत्यंभूत माहिती सर्व जनप्रतिनिधींना उपलब्ध होत नाही तोपर्यंत या प्रस्तावाबाबत अंमलबजावणी करू नये अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले यांनी केली आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai