रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचे दिमाखदार उद्घाटन
- by Aajchi Navi Mumbai
- May 15, 2026
- 25
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी सत्कार सोहळा
नवी मुंबई : सामान्य माणसाने असामान्य कसं व्हायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जीवनप्रवास आहे. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवलं, त्याच संस्थेला आजवर 135 कोटींहून अधिक रुपयांची गुरुदक्षिणा देऊन त्यांनी आधुनिक काळातील एकलव्य ही ओळख सार्थ ठरवली आहे, अशा गौरवपूर्ण शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला.
उलवे येथे रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी अभिष्ठचिंतन सोहळयाप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. नवी मुंबईतील सेक्टर 12, उलवे नोड येथे एक भव्य राजकीय आणि सामाजिक सोहळा संपन्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था, पनवेल आणि लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव वर्ष नियोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन सोहळाही मोठ्या थाटामाटात पार पडला. या दिमाखदार सोहळ्याला केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली, तर ज्येष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार शरद पवार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सामान्य कुटुंबात जन्म घेऊन मेहनतीच्या जोरावर असामान्य कर्तृत्व कसं गाजवायचं, याचा वस्तुपाठ म्हणजे रामशेठ ठाकूर यांचा जीवनप्रवास आहे. ज्या रयत शिक्षण संस्थेने त्यांना घडवले, त्या संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांनी आजवर 135 कोटींहून अधिक रुपयांची मदत केली असून, गुरूंनी न मागता सढळ हाताने गुरुदक्षिणा देणारा हा आधुनिक काळातील एकलव्य आहे. अवघ्या 200 रुपये पगारावर शिक्षक म्हणून आपली कारकीर्द सुरू करणाऱ्या रामशेठजींनी आपल्या आयुष्याची सर्व पुंजी समाजाला सुशिक्षित करण्यासाठी आणि उत्तम शैक्षणिक संस्था उभ्या करण्यासाठी खर्च केली, हे शिक्षणाचे मोठे पुण्यकर्म आहे.
त्यांच्या व्यावसायिक जिद्दीचे कौतुक करताना मुख्यमंत्री म्हणाले की, घरचे दागिने गहाण ठेवून आणि 10 हजार रुपयांच्या पहिल्या कंत्राटातून व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाने भूमिपुत्रही मोठे कंत्राटदार होऊ शकतात, हे आपल्या जिद्दीने सिद्ध केले. सत्तेच्या राजकारणात असतानाही वयाच्या 52 व्या वर्षी स्वेच्छेने निवडणूक राजकारणातून निवृत्ती घेण्याचा त्यांचा निर्णय हा राजकीय नि:स्पृहतेचे मोठे लक्षण आहे. दि.बा.पाटलांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्रांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा ऐतिहासिक असून, नवी मुंबई व रायगडचा विकास मुंबईपेक्षाही सुंदर शहर म्हणून करण्याचे सरकारचे ध्येय आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी रामशेठ ठाकूर दांपत्याला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
आपल्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात कृतज्ञता व्यक्त करताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले की, आजवरच्या 75 वर्षांच्या प्रवासात गाढवावरून माती वाहण्यापासून ते यशस्वी उद्योजक आणि राजकारणी होण्यापर्यंत अनेक खाचखळगे अनुभवले आहेत. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि जनतेने दिलेल्या उदंड प्रेमामुळेच आपले जीवन यशस्वी झाले असून, हे प्रेमच आपल्याला समाजकार्यासाठी ऊर्जा देते. 81 आणि 84 च्या आंदोलनातील संघर्षाची आठवण करून देताना त्यांनी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच, नवी मुंबई आणि उलवे परिसरातील गावठाण विस्तार व पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक असून प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या मुलांनी समाजकार्याचा वारसा समर्थपणे स्वीकारल्याचा आनंद व्यक्त करत, पुढील 10 ते 20 वर्षे जनतेची सेवा करण्यासाठी आपण सज्ज आहोत, असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. यावेळी रामशेठ ठाकूर यांचा वैयक्तीक आणि राजकीय कार्यकाळाची चित्रफीत सदर करण्यात आली.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai