विकासासाठी नगरसेवकांमध्ये खडाजंगी
- by Aajchi Navi Mumbai
- May 15, 2026
- 21
विकास शहराचा की जनसेवकांचा? नवी मुंबईकरांचा सवाल
नवी मुंबई : गेली सहा वर्षे सत्तेपासून दूर राहिल्यानंतर शहराच्या विकासासाठी नगरसेवक झपाटून काम करत असल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत आहे. एकाच प्रभागात चार नगरसेवक असल्याने आणि चारही प्रभागाची मते मिळवण्याच्या उद्देशाने सर्वच नगरसेवक चारही प्रभागात पायाला भिंगरी लावून काम करत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या या कार्यउत्साहामुळे सध्या त्यांच्यातच वादावादी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, सध्या नगरसेवकांनी लावलेला कामाचा झपाटा हा शहराच्या विकासासाठी आहे की, जनसेवकांच्या विकासासाठी आहे असा सवाल मात्र नवी मुंबईकरांना पडला आहे.
नवी मुंबई महापालिकेत सध्या ठेकेदारांची चलती असून नगरसेवकांच्या मार्फत ते कामे मिळवत असल्याचे बोलले जात आहे. एखाद्या प्रभागात काम निघण्याआधीच ठेकेदार कायम होत असून नंतर निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याचे बोलले जाते. पालिकेतील भ्रष्टाचाराचा हा महा‘सागर’ वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या आशिर्वादाशिवाय शक्य नसल्याचे राजकीय समिक्षकांचे मत आहे. नेरूळ सेक्टर 10 मधील पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या कामाच्या निविदेवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या दोन प्रबळ नगरसेवकांमध्ये महानगरपालिका मुख्यालयातच जोरदार खडाजंगी झाली. या घटनेमुळे पालिका प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकच एकमेकांसमोर उभे ठाकल्याने महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
नेरूळ सेक्टर 10 परिसरातील अंतर्गत वसाहतींमध्ये नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी डिसेंबर 2025 मध्ये निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मंगळवारी संबंधित निविदा उघडण्यात आल्यानंतर एका ठेकेदाराला तांत्रिक कारणांवरून अपात्र ठरवण्यात आल्याने वादाला सुरुवात झाली. प्रभाग 24 चे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी संबंधित ठेकेदाराकडे तब्बल 34 वर्षांचा अनुभव असूनही त्याला डावलण्यात आल्याचा आरोप केला. निविदा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आलेली नाही, तसेच दुसऱ्या ठेकेदाराला लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी अधिकाऱ्यांसमोर केला. या कामासाठी फेरनिविदा काढण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी लावून धरली. याचवेळी प्रभाग 23 चे नगरसेवक प्रदीप गवस यांनी इथापे यांच्या आरोपांना विरोध केला. नियमांच्या चौकटीत पात्र ठरणाऱ्या ठेकेदारालाच काम देण्यात यावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. आपल्या प्रभागातील कामांमध्ये अनावश्यक हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केल्याचे सांगितले जाते. यानंतर दोन्ही नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक वाढली आणि वातावरण तापले. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला.
संबंधित ठेकेदाराला अपात्र ठरवण्यामागील कारणांबाबत पालिका वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. महापालिकेत एखाद्या अन्य ठेकेदाराने निविदा भरल्यास त्याला अपात्र करण्याचे किंवा निविदेचे 120 दिवस पुर्ण होण्याची वाट बघून निविदा रद्द करण्याची प्रक्रिया शहर अभियंता विभागात सर्रास राबवली जाते. एखाद्या ठेकेदाराने निविदा भरल्यास त्याच्या कामाच्या तक्रारी करुन त्यास बेजार करण्याची पद्धत अवलंबली जाते. त्यामुळे स्थानिक नगरसेवकांना विरोध करुन कोणताही ठेकेदार निविदा भरत नसल्याचे समोर आले आहे.
- ठेकेदार आणि नगरसेवकांचे साटेलोटे
मनसे नगरसेवक अभिजीत देसाई यांनी नवी मुंबई महापालिकेच्या ठेकेदार आणि नगरसेवक यांच्या साटेलोट्यावर चांगलाच प्रकाश टाकल्याने पालिकेतील टक्केवारी उघडकीस आली आहे.मर्जीतल्या ठेकेदाराला काम देण्यासाठी निवडून दिलेले नाही तर लोकांनी त्यांची कामे करण्यास निवडून दिले याचे भान सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी ठेवले पाहिजे. अशा नगरसेवकांमुळे चुकीची प्रथा पालिकेत सुरु असून त्यामुळे भ्रष्टाचार बोकाळला असल्याची खंत देसाई यांनी व्यक्त केली. - मालमत्तेची चौकशी करा
ठेकेदारासाठी सत्ताधारी नगरसेवक आपापसातच वाद करत असल्याने लोकप्रतिनिधींची टक्केवारी पुन्हा एकदा समोर आली आहे. जनतेच्या पैशाची अनावश्यक कामांवर उधळपट्टी करणाऱ्या लोकप्रतिनिधींवर अंकुश बसणे गरजेचे आहे. निवडून आलेल्या नगरसेवकांच्या नामनिर्देशन पत्राची माहिती मिळवली असून येणाऱ्या काळात त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याची मागणी प्रवर्तन संचालनालयाकडे करणार असल्याचे स्वान संस्थेचे सरचिटणीस संतोष जाधव यांनी सांगितले.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai