नवी मुंबईत आरोग्य सुविधांचा विस्तार
- by Aajchi Navi Mumbai
- Jun 17, 2026
- 26
एमआरआय सेंटर, कॅथलॅब, मिल्क बँकसह विविध सेवांचे लोकार्पण
नवी मुंबई ः महापालिकेच्या वतीने नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधा गुणवत्तापूर्ण करण्यावर भर दिला जात असून आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वाशी सार्वजनिक रुग्णालयात करण्यात आला. या सेवा नवी मुंबईतील नागरिकांना प्राधान्याने उपलब्ध करुन दिल्या जाव्यात असे यावेळी नाईक यांनी सूचित केले.
वाशी येथील सार्वजनिक रूग्णालयात एम.आर.आय. सेंटर लोकार्पण, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग (सी.एस.एस.डी.) कार्यान्वित करणे, रूग्णालय बेड्स उपलब्धता डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, वाशी आणि ऐरोली येथे ह्रदयविकार उपचार केंद्र (कॅथलॅब) कामाचा शुभारंभ, मिल्क बँक सुविधा लोकार्पण, मॉड्युलर मॉर्च्युरी (शवागृह) कार्यान्वित करणे आदी सुविधांचा कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, से.8, सीबीडी बेलापूर येथील डायलिसीस सेंटर लोकार्पण आणि सेक्टर 24, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रूग्णालय लोकार्पण ऑनलाईन संपन्न झाले. या सोबतच नमुंमपा आणि गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद भवन, से.14, वाशी येथील डायलिसीस सेंटरचे लोकार्पण आणि महापे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण प्रत्यक्ष स्थळी जाऊन संपन्न झाले. यामधील मिल्क बँक सुरु करण्याबाबतची मागणी व पाठपुरावा आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आला आहे.
महापौर सुजाता पाटील यांनी नागरिकांना केवळ पायाभूत आरोग्य सुविधा नव्हे तर सेवाभाव आणि समर्पणाच्या भावनेतून वैद्यकीय सेवा देणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले. महापालिका दर्जेदार आरोग्य सेवा देण्यास कटिबद्ध असून भविष्यात आणखी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. खासगी रुग्णालयांमधील बेड उपलब्धतेची माहिती नागरिकांना सहज मिळावी यासाठी विशेष डॅशबोर्ड सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पूर्वी संसर्गजन्य आजारांचे प्रमाण अधिक होते, मात्र आता जीवनशैलीशी संबंधित आजार वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत नागरिकांच्या सर्वांगीण आरोग्य तपासणीवर भर दिला जात असून वाढत्या स्थूलपणामुळे होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच नवी मुंबईतील पाळीव प्राण्यांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्यात आले असून कॅथलॅबच्या माध्यमातून हृदयासोबतच मेंदूवरील उपचारांचीही सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ यांनी आपल्या कार्यकाळात नागरिकांसाठी आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध होत असल्याचा आनंद व्यक्त केला. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी नव्या सुविधांची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाच्या शेवटी आरोग्य समितीचे उपसभापती गणेश सकपाळ यांनी आभार मानले. नवी मुंबई महाालिकेच्या या उपक्रमामुळे शहरातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला अधिक बळकटी मिळणार असून नागरिकांना अत्याधुनिक उपचार सुविधा स्थानिक स्तरावर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
संबंधित पोस्ट
सब्सक्राइब करा न्यूज़लेटर
SUBSCRIBE US TO GET NEWS IN MAILBOX
लाइव क्रिकेट स्कोर
शेअर मार्केट
Ticker Tape by TradingView
Stock Market by TradingView
रिपोर्टर
The Reporter specializes in covering a news beat, produces daily news for Aajchi Navi Mumbai News
Aajchi Navi Mumbai